धक्कादायक ! वैष्णोदेवी मंदिराजवळ दारू प्यायल्याच्या आरोपाखाली ऑरी आणि 7 जणांवर गुन्हा दाखल
esakal March 17, 2025 06:45 PM

Bollywood Entertainment News : बॉलिवूड सेलिब्रिटीजचं बेस्ट फ्रेंड आणि सोशल मीडिया इंफ्लून्सर ऑरी म्हणजेच ओरहान अवतारामानी आणि इतर सात व्यक्तींवर वैष्णोदेवी मंदिराजवळ दारूचं सेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. एएनआय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं. कटरा येथील प्रतिबंधित क्षेत्रात दारू प्यायल्यावरून ऑरी आणि सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार कटरा येथील एका हॉटेलमध्ये दारू प्यायल्याच्या आरोपाखाली ऑरी म्हणजेच ओरहान अवतारामानी आणि सात जणांविरुद्ध एफआरआय दाखल करण्यात आला आहे. तर टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, यात एका रशियन नागरिकाचाही समावेश आहे. तिचं नाव अनास्तासिला अर्जामास्किना असं आहे. याशिवाय पोलिसांनी दर्शन सिंग, पार्थ रैना, रितिक सिंग, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली यांच्याविरुद्धही एफआरआय दाखल केला आहे.  त्यांच्यावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

कटरा येथील कॉटेज सूट परिसरात ऑरी आणि त्याच्या मित्रांनी दारूचं सेवन केलं. वैष्णोदेवी हे हिंदूंच्या पवित्र स्थळांपैकी एक असल्याने मंदिराच्या जवळील परिसरात मांसाहार आणि मादक पदार्थांविरुद्ध कडक नियम असून त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे.

रियासी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने टाईम्स नाऊला  दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,"या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसपी कटरा, उप एसपी कटरा आणि एसएचओ कटरा यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. ओरीसह सर्व आरोपींना नोटीस पाठवून त्यांना चौकशीत सामील होण्याचे निर्देश दिले जातील. एसएसपी रियासी यांनी पुन्हा सांगितले आहे की, धार्मिक स्थळांवर दारू किंवा ड्रग्ज सेवन यासारख्या कृत्यांमध्ये सहभागी होऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल."

कोण आहे ऑरी ?

ऑरी हा कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. लवकरच तो बॉलिवूड सिनेमातही दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉरमध्ये तो दिसणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय अनेक तरुण बॉलिवूड कलाकारांचा जवळचा मित्र म्हणून त्याची ओळख आहे. बॉलिवुड सेलिब्रिटीजच्या पार्टीजमध्ये तो नेहमी दिसतो. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान यांचा तो जवळचा मित्र आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.