सोलापुरात कावळ्यांचा मृत्यू (Crows Death) वाढत असताना प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभाग टोलवाटोलवी करताना दिसत आहेत.
सोलापूर : बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन फक्त कागदी घोडेच नाचवत असल्याचे आजही दिसले. किल्ला बाग व धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसरातील चिकन, अंडी व तत्सम पदार्थांची विक्री बंदचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला. या आदेशाची अंमलबजावणी कोणी करायची? यावरून (Solapur Municipal Corporation), पोलिस, अन्न प्रशासन व पशुसंवर्धन विभागात संभ्रम असल्याने या भागातील चिकन विक्री आज खुलेआम सुरू होती.
किल्ला बाग व धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर २१ दिवसांसाठी प्रतिबंधितही केला आहे. या ठिकाणी माणसांचा बिनधास्त वावर असल्याचे आजही दिसले. सोलापुरात कावळ्यांचा मृत्यू (Crows Death) वाढत असताना प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभाग टोलवाटोलवी करताना दिसत आहेत. विजापूर रोडवरील तलाव परिसरात आज दोन मृत कावळे नागरिकांना दिसले.
याच मार्गावर चिकन, अंडी यांची खुलेआम विक्री सुरू होती. तशीच स्थिती किल्ला बाग परिसरातील चिकन दुकानांचीही होती. कोंबड्या उघड्यावर ठेवण्यात आल्या होत्या. नेहमीच्या तुलनेत आज चिकन खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद कमी दिसत होता. बर्ड फ्लूसोबतच आज तुकाराम बीज असल्याने हा प्रतिसाद कमी असल्याचे सांगण्यात आले.
दहा किलोमीटर परिसरातून १२६ नमुनेसोलापुरातून दहा किलोमीटर परिघातील ६३ कोंबड्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने घेतले आहेत. त्यामध्ये कोंबड्याच्या नाकातील स्त्रावाचे ६३ तर विष्ठेचे ६३ असे एकूण १२६ नमुने आहेत. हे नमुने बर्ड फ्लूच्या निदानासाठी आज (सोमवार, ता. १७) पुण्यातील प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी घेणार आज बैठकसोलापुरातील कावळे, बगळे आणि घार यांच्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असल्याचे गुरुवारी (ता. १३) रात्री समजले. त्यानंतर शुक्रवारी धुलीवंदन, शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी आल्याने कागदोपत्रांशिवाय प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय दिसला नाही. आज (सोमवार, ता. १७) सकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत ‘बर्ड फ्लू’साठी बैठक बोलविण्यात आल्याचे समजते.