५१७३१
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांमध्ये नाराजी
प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ः राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यांवर निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक नाराज आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले व कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी जाहीर केलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, मान्यताप्राप्त आयटी शिक्षकांच्या समायोजनाबाबतचा शासनादेश त्वरित निर्गमित करण्यात यावा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवड श्रेणीसाठीची २० टक्क्याची अट रद्द करावी व प्रलंबित वाढीव पदाचे समायोजन करावे. विनाअनुदानित सेवेत असलेल्या शिक्षकांची अनुदानितकडे बदली करून त्या प्रस्तावास शिक्षण उपसंचालकाने त्वरित मान्यता द्यावी आदी महत्वांच्या मागण्यांचा समावेश आहे.
मागण्यांची पूर्तता व समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अन्यथा यापुढे याहून तीव्र आंदोलन करावे लागेल, असे संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. आर. पाटील व सचिव प्रा. दिलीप जाधव यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे. या वेळी रत्नागिरी तालुक्यातील प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. दत्तात्रय माळवदे, प्रा. सुमेध मोहिते, प्रा. लिंगायत, राकेश मालप, मनस्वी लांजेकर, क्षमा पुनस्कर आदी उपस्थित होते.
चौकट
शिक्षकांच्या अन्य मागण्या
- संचालक कार्यालयात त्रुटी पूर्तता केलेल्या प्रलंबित वाढीव पदाच्या फाइल्स त्वरित मंत्रालयात मागवून त्या पदांना मान्यता देऊन त्यांच्या समायोजनाचे आदेश द्यावेत. वेतन आयोगाचे थकीत हप्ते त्वरित द्यावेत.
- सद्यस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात २१ विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नतेमध्ये ३१ विद्यार्थी ग्राह्य धरावे.
- एमफिलधारक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकाप्रमाणे वेतन वाढ लागू करावी.
- कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्ष कमी झाला किंवा शून्य झाला तरच अतिरिक्त घोषित करावे.
- अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील अंशकालीन घड्याळी तासिकावरील शिक्षकांना शासकीय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकाप्रमाणे मानधन द्यावे व कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य यांना पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी.
- अर्धवेळ शिक्षक पूर्ण वेळ झाल्यावर अर्धवेळ सेवेचा कालावधी हा वेतनवाढ व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावा.
- अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करावी.
- शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत.
- शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत.