महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या!
esakal March 18, 2025 12:45 AM

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या!
सांताक्रूझ भीमवाडा ते पोलिस ठाण्यादरम्यान रिपाइंचे आंदोलन
घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियांच्या वतीने सांताक्रूझ भीमवाडा ते पोलिस ठाण्यादरम्यान रॅली काढून आंदोलन करण्यात आले.
१९४९ चा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा रद्द करावा, तेथील विश्वस्त मंडळ बरखास्त करून बौद्धांच्या ताब्यात व्यवस्थापन द्यावे, अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस पॅंथर नेते भाई विवेक गोविंदराव पवार यांनी केले आहे.
सांताक्रूझ भीमवाडा येथून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, पंचशील ध्वज, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, हातात विविध मागण्यांचे फलक धरून शेकडो स्त्रिया, पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आदेश देऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा, अशी मागणी विवेक गोविंदराव पवार यांनी या वेळी केली. सांताक्रूझ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोनिस निरीक्षक वैभव शिंगाडे यांना निवेदन देण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.