6699
कोनवडे (ता. भुदरगड) ः येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी जाऊन कर भरण्याचे आवाहन करताना.
........
घरफाळा, पाणीपट्टी वसुलीचे आव्हान
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कसरत : ग्रामस्थांची उदासीनता
अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. १७ : आर्थिक वर्ष अंतिम टप्प्यात असल्याने गावोगावी ग्रामपंचायतीची घरफाळा, पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू आहे. ग्रामपंचायतीचा हा कर भरण्यास नागरिकांची मात्र चालढकल व उदासीनता दिसून येत असल्यामुळे ग्रामपंचायतींची घरफाळा, पाणीपट्टीची शंभर टक्के कर वसुली करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
मार्च महिना सुरू झाला तरी बहुतांश ग्रामपंचायतींची करवसुली २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच पोहोचली आहे. १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सर्व अधिकारी ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वसुली पथक त्या दृष्टीने गावोगावी कार्यरत आहे. करवसुलीची मोहीम जानेवारीपासूनच राबविण्यास सुरुवात केली आहे. वसुली मोहिमेच्या माध्यमातून गटविकास अधिकारी सहायक गटविकास अधिकारी व पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विशेष वसुली पथक ग्रामस्थांना कराची रक्कम भरण्याचे आवाहन करत आहे.
बहुतांश नागरिक ग्रामपंचायतीचा कर वेळेवर भरण्यास उदासीनता दाखवत असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कराची अपेक्षित वसुली होत नाही. परिणामी कराच्या रकमेची थकबाकी वाढत आहे. चालू तसेच थकीत असलेल्या कराची वेळेवर अपेक्षित वसुली व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कराची रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदार नागरिकांना ग्रामपंचायतीकडील कोणत्याही प्रकारचे दाखले न देणे, नळ पाणीपुरवठ्याचे कनेक्शन बंद करण्याची कारवाई करत आहेत. तरीही बहुतांश नागरिक ग्रामपंचायतीचा कर वेळेवर भरण्यास चालढकल करीत आहेत.
करांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच प्रत्येक ग्रामपंचायत नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देत असते. तसेच कर्मचारी पगार दिवाबत्ती बिल, पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती व वीज बिल, गावातील स्वच्छता आदीसाठीचा खर्चही या करांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून केला जातो; परंतु कराची अपेक्षित वसुली न झाल्यास त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे गावामध्ये मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावरही ग्रामपंचायतींना मर्यादा येत आहेत.
..............
चौकट...
गावच्या विकासाची आणि प्रशासनाची आर्थिक मजबुती कर वसुलीवर अवलंबून असते. ग्रामपंचायतीला मिळणारे शासकीय अनुदान तोकडे असते. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटर्स, सार्वजनिक शौचालय, शिक्षण, आरोग्य सेवा, दिवाबत्ती यांसारख्या सेवा सुधारण्यासाठी विविध शासकीय निधी अनुदान मिळवण्यासाठी आणि गावात आधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी गावची शंभर टक्के करवसुली होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गावाला स्वयंपूर्णता मिळते व गावातील समस्या प्रभावीपणे सोडविता येतात. त्यामुळे ग्रामस्थांनी शंभर टक्के कर वसुली भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
- डॉ. शेखर जाधव, गटविकास अधिकारी, पंचायत समिती भुदरगड