मालिका अभिनेत्रीचा सहकर्मचाऱ्याकडून विनयभंग
अंधेरीतील होळीच्या पार्टीत रंग लावताना घडला प्रकार
अंधेरी, ता. १७ (बातमीदार) ः मालिका अभिनेत्रीचा तिच्याच सहकाऱ्याने विनयभंग केल्याची घटना अंधेरीतील होळीच्या पार्टीत शुक्रवारी (ता. १४) घडली. याप्रकरणी सहकर्मचारी तक्ष नारायण याच्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मालाडच्या मढ परिसरात २९ वर्षांची तक्रारदार तरुणी राहत असून, ती अभिनेत्री आहे. तिने काही हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती अंधेरीतील एका खासगी चॅनेलमध्ये कामाला असून, तिथेच तक्ष नारायण हादेखील काम करतो. १४ मार्चला होळीनिमित्त कंपनीने त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. तिथेच ती दोन मित्रांसोबत आली होती. दारूच्या नशेत असलेल्या तक्षने तिच्याशी जवळीक साधून तिला जबदस्तीने रंग लावण्याचा प्रयत्न केला. अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. मित्रांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांच्याशी धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर तिने आंबोली पोलिसांत तक्ष नारायणविरुद्ध तक्रार केली.