पाकिस्तान क्रिकेट टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर द्विपक्षीय मालिकेतही पराभवाची मालिका यशस्वीरित्या कायम ठेवली आहे. पाकिस्तान सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने रविवारी 16 मार्चला पाकिस्तानवर 9 विकेट्सने धुव्वा उडवला. न्यूझीलंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर आता उभयसंघात मंगळवारी 18 मार्चला दुसरा टी 20i सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 30 मिनिटांआधी टॉस होणार आहे.
सलमान आगा याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर मायकल ब्रेसवेल न्यूझीलंडचं नेतृत्व करतोय. पाकिस्तानला या मालिकेतील सलामीच्या सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने विजयासाठी मिळालेलं 92 धावांचं आव्हान हे 61 चेंडूत पूर्ण केलं होतं. तसेच पाकिस्तानच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. पाकिस्तानच्या फक्त तिघांचा अपवाद वगळता इतर एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानसमोर पहिल्या पराभवाचा वचपा घेत कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने विजयाने सुरुवात केली असल्याने त्यांचा विश्वास दुणावलेला आहे. त्यात न्यूझीलंड मायदेशात खेळत आहेत. त्यामुळे न्यूझीलंडला घरच्या स्थितीचा फायदा आहे. अशात आता या दुसऱ्या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
टी 20i मालिकेसाठी पाकिस्तान टीम : सलमान आगा (कर्णधार), मोहम्मद हरीस (विकेटकीपर), हसन नवाज, इरफान खान, शादाब खान, खुशदिल शाह, अब्दुल समद, जहंदाद खान, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, मोहम्मद अली, ओमेर युसूफ, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान आणि सुफियान मुकेम.
टी 20i मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टीम सायफर्ट, फिन ऍलन, टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल हे (विकेटकीपर), झॅकरी फॉल्केस, कायल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, बेन सीयर्स आणि विल्यम किंवा विल्यम.