अंतराळात एकाच प्रवासात सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम 437 दिवसांचा आहे. अंतराळ कक्षेत दीर्घकाळ राहिल्यानं अंतराळवीराच्या शरीरावर काही आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतात, त्यांचे स्नायू, मेंदू आणि त्यांच्या आतड्यातील बॅक्टेरियाही (जीवाणू) बदलू शकतात.
अंतराळवीर आणि बिच विल्मोर यांनी कधीही अंतराळात अशा पद्धतीनं नऊ महिने राहावं लागेल असा विचार केला नसेल. त्यांचा बोइंग स्टारलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाण्याचा सुरुवातीचा प्रवास जून 2024 मध्ये केवळ आठ दिवसांसाठी होता.
परंतु, यानात तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळं त्यांच्याशिवाय यान पृथ्वीवर परत आलं. त्यामुळं त्यांचा अवकाशातील मुक्काम अपेक्षेपेक्षा जास्त लांबला.
अर्थातच, या दोघांनाही अंतराळातील हा कठीण प्रवास नवीन नाही. ते दोघेही अनुभवी अंतराळवीर आहेत. पण अंतराळातील विचित्र, कमी गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात दीर्घकाळ राहिल्यामुळं शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. हे कसं घडतं समजून घेण्यासाठी, आपल्याला जे जास्त काळ अवकाशात किंवा अंतराळात राहिले आहेत, त्यांच्याकडे पाहणं आवश्यक आहे.
आत्तापर्यंतचा सर्वात लांब एकल अंतराळप्रवास नासाचे अंतराळवीर फ्रँक रुबिओ यांनी केला आहे. त्यावेळी ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) 371 दिवस राहिले होते. अमेरिकन फुटबॉल मैदानाएवढ्या आकाराचे मॉड्यूल्स आणि सोलर पॅनेल्सच्या संकलनावर त्यांनी तो वेळ घालवला.
त्यांचा कक्षेतला कालावधी हा पूर्वीच्या 355 सलग दिवसांच्या अमेरिकी विक्रमापेक्षा जास्त होता. मार्च 2023 मध्ये ते आणि त्यांचे सहकारी पृथ्वीवर परतण्यास तयार होते. त्याचवेळी त्यांच्या अंतराळ यानातील कुलंट लिकेज असल्याचं लक्षात आलं. त्यामुळं त्यांचं त्यावेळचं उड्डाण थांबवण्यात आलं.
अखेरीस त्यांना ऑक्टोबर 2023 मध्ये पृथ्वीवर परतावं लागलं. अवकाशातील अतिरिक्त महिन्यांमुळं रुबिओ यांना पृथ्वीच्या चारही बाजूला एकूण 5,963 प्रदक्षिणा घालता आल्या. त्यात त्यांनी 157.4 मिलियन मैल (253.3 मिलियन किलोमीटर) अंतर प्रवास केला.
तरीही, मानवी इतिहासातील सर्वात प्रदीर्घ अंतराळ प्रवासाच्या विक्रमापासून ते आणखी दोन महिने दूर होते.
रशियन अंतराळवीर व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांनी 1990 च्या दशकाच्या मध्यात मीर स्पेस स्टेशनवर (अंतराळ स्थानक) 437 दिवस घालवले होते.
आणि सप्टेंबर 2024 मध्ये, दोन रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेंको आणि निकोलाई चब यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (आयएसएस) सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम मोडला.
या जोडीनं 374 दिवस कक्षेत घालवले. हे दोघे सोयुझ एमएस-24 अंतराळयानामध्ये आयएसएसवरुन प्रस्थान केलं. त्यांच्यासोबत अमेरिकन अंतराळवीर ट्रेसी डायसन होते. डायसन हे 6 महिने अंतराळ स्थानकावर होते.
कोनोनेंको यांना पृथ्वीवर परतलेल्या कॅप्सूलमधून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं आणि त्यांनी दोन्ही अंगठ्यांनी थम्सअपची खूण केली होती. अंतराळातून आलेली ही कॅप्सूल कझाकिस्तानच्या स्टेप्पेमधील झेजकाझगान या दुर्गम गावाजवळ धुळीच्या ढगात पृथ्वीवर परतली. आता त्यांच्या नावे अंतराळात एकत्रितपणे सर्वाधिक काळ म्हणजे एकूण 1111 दिवस राहण्याचा विक्रम आहे.
कोनोनेंको आणि चब यांनी त्यांच्या नवीन आयएसएस मोहिमे दरम्यान पृथ्वीच्या 5,984 कक्षांमध्ये 158 मिलियन मैलांहून अधिक अंतर प्रवास केला. पण अंतराळ स्थानकाच्या कमी गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात इतका वेळ घालवल्यामुळं त्यांच्या शरीरावर परिणाम झाला. म्हणून त्यांना रिकव्हरी टीमनं कॅप्सूलमधून बाहेर काढलं.
रुबिओ यांनी स्वतःच्या दीर्घकाळाच्या अंतराळ प्रवासानं मानवांना दीर्घकाळाच्या अंतराळ प्रवासाशी कसं जुळवून घेता येईल आणि त्यातून होणाऱ्या समस्यांचा सामना कसा करावा यावर महत्त्वाची माहिती दिली.
ते पहिल्या अंतराळवीरांपैकी एक आहेत, ज्यांनी अशा प्रकारच्या अभ्यासात भाग घेतला, ज्यात मर्यादित जिम उपकरणांसह व्यायाम केल्यानं मानवी शरीरावर कसा परिणाम होतो, याचा शोध घेतला जात होता.
याचे परिणाम अद्याप प्रकाशित झालेले नाहीत. परंतु, ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरेल. कारण मानवाला सौरमालेत अधिक खोलवर प्रवेश करण्यासाठी मोहिमेवर क्रू पाठवण्याचा विचार सुरु आहे.
उदाहरणार्थ, मंगळावर परतीच्या प्रवासाला सध्याच्या योजनांनुसार सुमारे 1,100 दिवस (तीन वर्षांपेक्षा जास्त) लागण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी वापरलं जाणारं अंतराळयान हे आयएसएसपेक्षा खूपच लहान असेल. याचा अर्थ असा की तिथं लहान आणि हलक्या वजनाच्या व्यायाम उपकरणांची आवश्यकता असेल.
पण फिटनेस राखण्यात येणाऱ्या अडचणीं व्यतिरिक्त, अंतराळप्रवासाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो?
स्नायू आणि हाडेगुरुत्वाकर्षणाच्या सततच्या आकर्षणाशिवाय, अंतराळात आपले स्नायू आणि हाडांचं वजन लवकर कमी होऊ लागतं. सर्वात जास्त परिणाम त्या स्नायूंवर होतो जे आपला पोस्चर राखण्यास मदत करतात. जसं की पाठीचे स्नायू, मान, पिंडऱ्या आणि क्वाड्रीसेप्स.
मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये ते जास्त मेहनत करत नाहीत. त्यामुळं ते हळूहळू दुर्बल होऊ लागतात. फक्त दोन आठवड्यांतच स्नायूंचे वजन 20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. तीन ते सहा महिन्यांच्या दीर्घकाळाच्या मोहिमेत ते 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
तसंच, अंतराळवीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात असताना त्यांच्या हाडांवर जितका यांत्रिक ताण येतो, तितका ताण त्यांना अंतराळात न पडल्यामुळे त्यांच्या हाडांची ताकद कमी होऊ शकते.
अंतराळवीर अंतराळात घालवलेल्या दर महिन्याला 1 ते 2 टक्के हाडांचे वजन गमावू शकतात आणि सहा महिन्यांच्या कालावधीत ते 10 टक्के पर्यंत कमी होऊ शकते (पृथ्वीवर, वयोवृद्ध पुरुष आणि महिलांच्या हाडांचे वजन दरवर्षी 0.5 टक्के ते 1 टक्के एवढं कमी होतो). यामुळं हाडांचे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो आणि बरे होण्यास लागणारा वेळ देखील वाढतो. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या हाडांच्या वजनाला सामान्य स्थितीत येण्यासाठी चार वर्षे लागू शकतात.
याचा सामना करण्यासाठी, अंतराळवीर आयएसएसच्या कक्षेत असताना दररोज 2.5 तास व्यायाम आणि कठोर प्रशिक्षण घेतात. यामध्ये स्क्वॉट्स, डेडलिफ्ट्स, रोव्ज आणि बेंच प्रेस यांचा समावेश आहे, जे आयएसएसच्या "जिम" मध्ये बसवलेल्या प्रतिरोधात्मक व्यायाम उपकरणाचा वापर करून केले जातात.
याचबरोबर, ते नियमितपणे ट्रेडमिल आणि एक्सरसाइज बाइकवर सायकलिंग करतात. तसेच, त्यांच्या हाडांना शक्य तितकं निरोगी ठेवण्यासाठी ते पूरक आहार देखील घेतात.
अलीकडील एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, ही व्यायाम पद्धत देखील स्नायूंचे कार्य आणि आकारात होणारे नुकसान टाळण्यासाठी पुरेशी नाही. प्रतिकार व्यायामामध्ये जास्त भार आणि उच्च तीव्रतेचे अंतराल (इंटरव्हल) प्रशिक्षण हे स्नायूंची हानी कमी करण्यासाठी मदत करू शकते का याची चाचणी करण्याची शिफारस केली आहे.
शरीरावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नसल्यामुळे, अंतराळवीरांना आयएसएसवर राहताना थोडंसं उंच झाल्याचा किंवा उंची वाढल्याचा अनुभव येऊ शकतो. कारण त्यांच्या मणक्यांमध्ये थोडासा विस्तार झालेला असतो. यामुळं अंतराळात पाठीच्या वेदना होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात आणि पृथ्वीवर परतल्यावर स्लिप डिस्कसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पृथ्वीवर परतण्याआधी आयएसएसवर झालेल्या एका ब्रिफिंगदरम्यान, रुबिओ यांनी त्यांच्या मणक्याची वाढ होत असल्याचं स्वतः सांगितलं होतं. यामुळं अंतराळयान त्यांना घेऊन पृथ्वीवर उतरल्यावर सीटवरुन बाहेर येताना मानेला दुखापत होऊ शकते. ही इजा टाळण्यास यामुळं मदत होऊ शकते, असं ते म्हणाले होते.
"मला वाटतं की माझ्या पाठीचा कणा वाढला आहे. त्यामुळं मी माझ्या सीट लाइनरमध्ये अडकलो आहे. त्यामुळं मी जास्त हालचाल केली नाही पाहिजे," असं ते म्हणाले.
वजन कमीकक्षेत असताना वजनाचं महत्व खूप कमी असतं. मायक्रोग्रॅव्हिटी (सुक्ष्म गुरुत्वाकर्षण) वातावरणामुळं कोणतीही गोष्ट जी बांधलेली नाही ती आयएसएसच्या वातावरणात मोकळ्या पद्धतीनं फिरू शकते, त्यात मानवाच्या शरीराचाही समावेश आहे. तरीही, कक्षेत असताना आरोग्यदायक वजन राखणं हे एक आव्हान असतं.
नासा त्याच्या अंतराळवीरांना विविध प्रकारचे पौष्टिक अन्न देण्याचा प्रयत्न करत असते. त्यात अलीकडेच आयएसएसवर लागवड केलेल्या काही सॅलड पानांचा समावेश आहे. तरीही ते अंतराळवीराच्या शरीरावर परिणाम करू शकतात.
स्कॉट केली, जे नासाचे एक अंतराळवीर आहेत. त्यांनी दीर्घकालीन अंतराळप्रवासाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सर्वात मोठ्या अभ्यासात भाग घेतला. ते आयएसएसवर 340 दिवस राहिले होते, तर त्यांचा जुळा भाऊ पृथ्वीवर परतला होता. त्यांनी कक्षेत असताना त्याच्या शरीराच्या 7 टक्के वजन गमावलं होतं.
दृष्टीपृथ्वीवर, गुरुत्वाकर्षण आपल्या शरीरातील रक्ताला खाली जाण्यास मदत करतं. हृदय त्याला पंप करुन पुन्हा वर ढकलतं. मात्र, अंतराळात या प्रक्रियेत गडबड होते (जरी शरीर थोड्याफार प्रमाणात त्याला जुळवून घेत असलं तरी), आणि यामुळं डोक्यात रक्त नेहमीपेक्षा जास्त जमा होऊ शकतं.
यातील काही प्रमाणात द्रव डोळ्याच्या मागील बाजूस आणि ऑप्टिक मज्जातंतूभोवती जमा होऊ शकतो, ज्यामुळं एडेमा होऊ शकतो.
यामुळे दृष्टीत बदल होऊ शकतो, जसं की तीक्ष्णता कमी होणं आणि डोळ्यांच्या संरचनेतील बदल. अंतराळात फक्त दोन आठवडे राहिल्यानंतर हे बदल होऊ शकतात. पण त्यानंतर वेळ जितका वाढतो, तितकी जोखीम वाढते. अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर सुमारे एक वर्षाच्या आत काहींची दृष्टी बदलते. पण काही बदल कायमचे होऊ शकतात.
गॅलेक्टिक कॉस्मिक किंवा वैश्विक किरण आणि ऊर्जा-युक्त सौर कणांच्या संपर्कात आल्यानं देखील डोळ्यांसंबंधी इतर समस्या उद्भवू शकतात. पृथ्वीचं वातावरण आपल्याला यापासून संरक्षण करण्यास मदत करतं.
पण एकदा आयएसएसच्या कक्षेत पोहोचल्यावर हे संरक्षण नाहीसं होतं. जरी अंतराळयानात अतिरिक्त रेडिएशनपासून वाचवण्यासाठी शील्डिंग किंवा कवच असले तरी आयएसएसवर असलेल्या अंतराळवीरांनी त्यांच्या डोळ्यात प्रकाशाची चमक पाहिल्याची नोंद केली आहे. कारण कॉस्मिक किरण आणि सौर कण त्यांच्या डोळ्यातील पडदा आणि ऑप्टिकल नर्व्हसवर म्हणजेच मज्जातंतूवर आदळतात.
न्यूरल शफलिंगआयएसएसवर दीर्घकाळ राहिल्यानंतर स्कॉट केलींच्या संज्ञानात्मक म्हणजेच आकलनात्मक कार्यक्षमतेमध्ये थोडासा बदल झाल्याचं आढळून आलं.
तरीही, संशोधकांना असं लक्षात आलं की, स्कॉट यांच्या संज्ञानात्मक कार्यक्षमतेची गती आणि अचूकता पृथ्वीवर परतल्यानंतर सुमारे सहा महिन्यांसाठी कमी झाली होती. कदाचित त्यांचा मेंदू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी आणि घरी परतल्यावरच्या त्यांच्या खूप वेगळ्या जीवनशैलीशी पुन्हा जुळवून घेत असावा.
2014 मध्ये 169 दिवस अंतराळ स्थानकावर राहिलेल्या रशियन अंतराळवीरावर केलेल्या एका अभ्यासातून असंही समोर आलं की, कक्षेत असताना मेंदूमध्ये काही बदल होऊ शकतात.
या अभ्यासात असं आढळले की मेंदूच्या त्या भागांमध्ये न्यूरल कनेक्टिव्हिटीच्या पातळीत बदल झाले आहेत, जे मोटर कार्याशी संबंधित आहेत. म्हणजेच, हालचाल आणि त्याचबरोबर व्हेस्टिब्युलर कॉर्टेक्समध्येही बदल झाले, जो ओरिएंटेशन, समतोल आणि आपल्या स्वतःच्या हालचालींच्या ग्रहणाबद्दल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
अंतराळात असताना वजनहीनतेचे विलक्षण स्वरुप पाहता, हे कदाचित आश्चर्यकारक नाही. अंतराळवीरांना अनेक वेळा गुरुत्वाकर्षणाशिवाय कार्यक्षमतेनं हालचाल कशी करावी हे शिकावं लागतं, कारण त्यांना काहीतरी पकडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाचा आधार नसतो आणि त्यांना अशा जगाशी जुळवून घ्यावं लागतं जिथं वर किंवा खाली असं काही नसतं.
अलीकडील एका अभ्यासानं दीर्घकालीन अंतराळ मोहिमे दरम्यान मेंदूच्या संरचनेतील इतर बदलांविषयी चिंता व्यक्त केली आहे. मेंदूमधील उजव्या बाजूकडील आणि थर्ड व्हेंट्रिकल्स (जे मेंदूतील सेरेब्रोस्पाइनल द्रव साठवण्याचं, मेंदूला पोषक द्रव्ये पुरवण्याचं आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम करतात) यामध्ये सूज येऊ शकते आणि ती सामान्य आकारात परत येण्यासाठी तीन वर्षांपर्यंतचा काळ लागू शकतो.
अनुकूल जीवाणूअलीकडील संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की, चांगल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या शरीरात आणि त्यामध्ये राहणाऱ्या सूक्ष्मजीवांची रचना आणि विविधता. हा मायक्रोबायोटा आपल्या अन्न पचवण्याच्या पद्धतीवर परिणाम करू शकतो. आपल्या शरीरातील सूजेच्या पातळीवर प्रभाव टाकू शकतो आणि अगदी आपल्या मेंदूच्या कार्य पद्धतीतही बदल करू शकतो.
केलींच्या आयएसएसच्या प्रवासानंतर केलेल्या संशोधनात आढळलं की, त्यांच्या आतड्यात राहणाऱ्या बॅक्टेरिया आणि फंगसमध्ये प्रचंड बदल झाले होते. त्यांच्या अंतराळात जाण्यापूर्वीच्या तुलनेत खूप बदलले होते.
हे पूर्णपणे आश्चर्यकारक नाही, कारण त्यांनी जे अन्न घेतलं आणि जे लोक त्यांच्यासोबत होते, ते खूप वेगळे होते (आपण ज्या लोकांसोबत राहतो, त्यांच्यापासून आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात आतड्याचे आणि तोंडाचे सूक्ष्मजीव मिळतात).
पण रेडिएशनला (किरणोत्सर्ग) सामोरं जाणं, पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर आणि शारीरिक हालचालींमधील बदल देखील यामध्ये एक भूमिका बजावू शकतात. (व्यायाम कसा आपल्या आतड्याच्या सूक्ष्मजीवांवर प्रभाव टाकतो, याबद्दल अधिक जाणून घ्या.)
त्वचेवरील परिणामआता पाच नासा अंतराळवीर आहेत ज्यांनी कक्षेत 300 पेक्षा अधिक दिवस घालवले आहेत. तरीही स्कॉट केली यांच्या प्रवासामुळे त्यांच्या त्वचेवरील परिणामांचा शोध घेण्यास मोठी मदत मिळाली.
संशोधनात आढळलं की, अंतराळ स्थानकावरून परत आल्यानंतर त्याच्या त्वचेवर सुमारे सहा दिवस पुरळ उठल्याचे आढळून आले. मोहिमेदरम्यान त्वचेला योग्य उत्तेजन न मिळाल्यामुळे त्यांना त्वचेची समस्या आली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे.
जनुकांवरील परिणामकेलींच्या दीर्घकालीन अंतराळ प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे त्यांच्या डीएनएवर त्याचा झालेला परिणाम.
प्रत्येक डीएनएच्या तंतूच्या शेवटी टेलोमेरेस नावाची संरचना असते, जी आपल्या जिन्स किंवा जनुकांचे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करण्यास मदत करते, असं मानलं जातं. जसजसे आपण वयाने मोठे होतो, हे टेलोमेरेस लहान होतात. परंतु, केली आणि इतर अंतराळवीरांवरील संशोधनात असं दिसून आलं की, अंतराळप्रवास या टेलोमेरच्या लांबीमध्ये बदल घडवून आणतो.
"सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अंतराळप्रवासादरम्यान टेलोमेरची लांबी महत्त्वाचा शोध होता," असं कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीतील पर्यावरणीय आणि रेडिओलॉजिकल आरोग्याच्या प्राध्यापक सुसान बेली म्हणाल्या. त्या केली आणि त्यांच्या भावावर संशोधन करणाऱ्या टीममधील सदस्य होत्या.
त्यांनी आणखी 10 असंबंधित अंतराळवीरांचा स्वतंत्र अभ्यास केला ज्यांनी सुमारे सहा महिन्यांच्या छोट्या मोहिमांमध्ये भाग घेतला होता. "सर्व क्रू मेंबर्ससाठी पृथ्वीवर परतल्यावर टेलोमेरची लांबी वेगाने कमी झाली हे देखील अनपेक्षित होतं. दीर्घकालीन आरोग्य आणि वृद्धत्वाच्या दृष्टीनं विशेषतः महत्त्वाचं, अंतराळ प्रवासानंतर अंतराळवीरांचे टेलोमेर पूर्वीपेक्षा बरेच लहान होते."
त्यांनी म्हटलं की, हे नेमके का घडतं याबाबत अजूनही उलगडा झालेला नाही. "आमच्याकडे काही सूचना आहेत. परंतु, सुमारे एक वर्ष अंतराळात राहिलेले क्रू सदस्य रुबिओ हे या प्रतिक्रियेची आणि तिच्या संभाव्य आरोग्य परिणामांची खूप चांगली ओळख पटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील."
एक संभाव्य कारण म्हणजे अंतराळात असताना रेडिएशनच्या जटिल मिश्रणाला सामोरं जाणं. जे अंतराळवीर दीर्घकालीन कक्षेत असताना रेडिएशनला एक्सपोज झाले आहेत, त्यांच्यात डीएनए खराब होण्याचे संकेत दिसून येतात, असे त्या म्हणतात.
स्कॉट केलींच्या जनुकांच्या व्यक्तीमत्वामध्ये काही बदल देखील दिसले – डीएनए वाचून पेशींमध्ये प्रथिनांचे उत्पादन करणारा मेकॅनिझम – जे त्यांच्या अंतराळप्रवासाशी संबंधित असू शकतात.
यापैकी काही बदल शरीराच्या डीएनए हानीला प्रतिसाद देण्याशी, हाडांच्या निर्मितीशी आणि तणावाच्या विरोधात प्रतिकारशक्तीच्या प्रतिसादाशी संबंधित होते. तथापि, या बदलांपैकी बहुतेक बदल ते पृथ्वीवर परतल्यानंतर सहा महिन्यांत सामान्य झाले होते.
जून 2024 मध्ये, एका नवीन अभ्यासाने अंतराळप्रवासात पुरुष आणि महिलांतील अंतराळवीरांच्या प्रतिकारशक्तीच्या प्रतिक्रियेमधील काही संभाव्य फरकांवर प्रकाश टाकला.
2021 च्या शरद ऋतूतील कक्षेत सुमारे तीन दिवस वेळ घालवलेल्या स्पेसएक्स इन्सपिरेशन 4 मिशनच्या क्रू सदस्यांकडून घेतलेल्या जनुक व्यक्तीमत्वाच्या डेटाचा उपयोग करून, या अभ्यासात प्रतिकारशक्ती, वय वाढ आणि स्नायूंच्या वाढीशी संबंधित 18 प्रथिनांमधील बदल ओळखले.
पूर्वीच्या मोहिमेवर असलेल्या 64 इतर अंतराळवीरांच्या जनुकांच्या क्रियाशीलतेशी तुलना केल्यावर, या अभ्यासात आढळलं की, अंतराळप्रवासापूर्वीच्या स्थितीच्या तुलनेत, सूज निर्माण करण्यात भूमिका बजावणाऱ्या तीन प्रथिनांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाल्याचे आढळून आले होते.
पुरुष अंतराळवीर सामान्यतः अंतराळप्रवासासाठी अधिक संवेदनशील होते. त्यांच्या जनुकांच्या क्रियाशीलतेमध्ये जास्त गडबड झाली होती आणि पृथ्वीवर परतल्यावर सामान्य स्थितीत परत येण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागला.
विशेषतः, संशोधकांना आढळलं की दोन प्रथिनांच्या जनुकीय क्रियाशीलतेवर पुरुषांवर जास्त परिणाम झाला, त्या प्रथिनांची नावं इंटरल्यूकिन-6 आणि इंटरल्यूकिन-8.
इंटरल्यूकिन-6 शरीरातील सूजेच्या पातळीचे नियंत्रण करण्यात मदत करते, तर इंटरल्यूकिन-8 जी रोगप्रतिकारक पेशींना संक्रमणाच्या ठिकाणी गुंडाळण्यासाठी तयार केली जाते. या दोन्ही प्रथिनांच्या जनुकीय क्रियाशीलतेवर स्त्रियांपेक्षा पुरुषांवर अधिक प्रभाव पडला. आणखी एक प्रथिन, ज्याचं नाव फायब्रिनोजेन आहे. जे रक्ताच्या गुठळ्या बनवण्याच्या प्रक्रियेत सामील असतं, त्याचाही पुरुष अंतराळवीरांवर जास्त परिणाम झाला.
परंतु संशोधकांचं म्हणणं आहे की, त्यांना अजूनही हे उलगडायचं आहे की महिला अंतराळप्रवासाच्या या विशिष्ट प्रभावाबद्दल कमी संवेदनशील का दिसतात. परंतु, ते त्यांच्या तणावाच्या प्रतिसादाशी संबंधित असू शकतात.
खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण नासाच्या अंतराळवीर पेगी व्हिटसन यांनी अंतराळातील व्यतीत केलेल्या काळामुळं त्यांच्या शरीरात कसे बदल झाले याचं वर्णन ऐकू शकता. अंतराळात 675 दिवस राहणाऱ्या पेगी यांनी इतर कोणत्याही अमेरिकनपेक्षा कक्षेत जास्त वेळ घालवला आहे. सध्याचा जागतिक विक्रम रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेंकोच्या नावावर आहे, ज्यांनी 878 दिवस अंतराळात घालवले आहेत.
रोगप्रतिकार प्रणालीस्कॉट केली यांना त्याच्या अंतराळ प्रवासापूर्वी, दरम्यान आणि नंतर लसी देण्यात आल्या होत्या, आणि त्यांची प्रतिकारक प्रणाली सामान्यपणे प्रतिसाद देत असल्याचे आढळले होते. पण बेली यांच्या संशोधनात असं आढळून आलं की, अंतराळवीरांना त्यांच्या कक्षेत असताना मिळणाऱ्या रेडिएशनच्या प्रमाणानुसार पांढऱ्या रक्त पेशींच्या संख्येत काही घट होत असते.
तरीही, अंतराळप्रवासाचा पृथ्वीवर राहण्यासाठी विकसित झालेल्या द्विपाद, मोठ्या मेंदू असलेल्या प्रजातीवर काय प्रभाव पडतो याबद्दल अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे.
संशोधकांनी रुबिओ यांच्या 371 दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचण्या, रक्ताचे नमुने आणि स्कॅन्स यावर अभ्यास केला. यातून ते निश्चितपणे अधिक शिकतील अशी त्यांना आशा आहे.
(हा लेख 27 सप्टेंबर 2023 रोजी प्रकाशित करण्यात आला होता. 12 जून 2024 रोजी स्पेसएक्स इन्सपिरेशन 4 मोहिमेवरील अभ्यासाच्या तपशीलांसह अपडेट करण्यात आला. 25 सप्टेंबर 2024 रोजी ओलेग कोनोनेंको आणि निकोलाई चब यांच्या आयएसएसवरील अंतराळप्रवासाचे तपशील समाविष्ट केले. 13 मार्च 2025 रोजी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्या तपशीलांसह ते पुन्हा अपडेट करण्यात आले आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)