भारत-चीन यांच्यातील शतकानुशतकांचे संबंध भविष्यात मजबूत करण्यावर पंतप्रधान मोदी यांनी दिलेला भर सावधगिरी आणि वास्तवभान दर्शवतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन या अमेरिकी पॉडकास्टरला दिलेल्या सविस्तर मुलाखतीची दखल घ्यायला हवी, याचे कारण पंतप्रधान जेव्हा विविध विषयांवर भाष्य करतात, तेव्हा त्यात सरकारची धोरणात्मक दिशा सूचित होते, बदलत्या जगाविषयीचे त्यांचे आकलन काय आहे, याची माहिती होते.
खरे तर संसदेचे अधिवेशन सुरू असताना तेथील चर्चेत जास्तीत जास्त भाग घेणे, विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर तेथे स्वतःहून निवेदन करणे, हे जास्त सयुक्तिक ठरले असते. एखाद्या परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्याविषयी संसदेत निवेदन करण्याची आजवर प्रथा होती. मोदींनी ती प्रथाही बऱ्याचदा धुडकावून लावली आहे.
या ‘पॉडकास्ट’मध्ये मात्र त्यांनी आपल्या कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना सद्यःस्थितीविषयी विशेषतः शेजारी देशांच्या संदर्भात मतप्रदर्शन केले आहे. त्याचे वेगळेपण असे की, नेहेमीचा ‘करून दाखवलं’ हा आवेश त्यात फारसा नव्हता. काहीशी आत्मपरीक्षणात्मक डूब त्यांच्या निवेदनात जाणवली.
दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलथापालथ करणाऱ्या आर्थिक धोरणांची भारताला किमान झळ बसावी किंवा बसूच नये, असा मोदींचा प्रयत्न दिसतो. तो स्वाभाविकही आहे. चीनविषयी केलेल्या विधानांमध्ये संयमी भूमिका डोकावली आहे, त्याचे कारण या अनिश्चिततेत आहे.
‘२०२० मध्ये भारत-चीन सीमेवरील घटनांमुळे उभय देशांत दुरावा निर्माण झाला. अलीकडे चीनचे अध्यक्ष शी जिन पिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर संबंध पूर्ववत होऊ लागले आहेत. अर्थात, पाच वर्षांचा दुरावा संपवायला काही काळ जाऊ द्यावा लागेल. पण भारत-चीनचे एकत्र असणे हे फायद्याचेच नव्हे तर जागतिक स्थैर्य आणि भरभराटीसाठीही आवश्यक आहे.
उभय देशांमध्ये स्पर्धा स्वाभाविक आहे. पण त्यात संघर्ष नको,’’ अशी सामंजस्याची भूमिका त्यांनी मांडली. चीनला परस्परसंबंधांच्या बाबतीत सबुरीचा संदेश देण्याचाही प्रयत्न केला आहे. पाच वर्षांपूर्वी, २०२०मध्ये लडाखमध्ये सीमेवरील चकमकीत झालेल्या जखमा भरून काढून भारत-चीन या प्राचीन संस्कृती असलेल्या देशांदरम्यानचे शतकानुशतकांचे संबंध भविष्यात मजबूत करण्यावर मोदी भर देतात.
एकेकाळी जगाच्या ‘जीडीपी’मध्ये चीन आणि भारताचा वाटा पन्नास टक्क्यांहून अधिक असल्याची जाणीवही ते करुन देतात. या निवेदनात वास्तवाचे भान दिसते. चीनबरोबरचे सीमेवरील वा अन्य वाद चिघळू नयेत, ही अपेक्षा रास्तच आहे. पाकिस्तानच्या बाबतीत मोदी यांची नेहमीची आक्रमक देहबोली नव्हती. ‘पाकिस्तानने भारताशी सतत संघर्षाचा मार्ग स्वीकारला. भारताशी छुपे युद्ध सुरु केले. अतिरेक्यांना निर्यात करण्याचे काम सुरु केले.
लोकांना मारणे आणि कापून काढणे याला विचारधारा म्हणत नाहीत,’ असे सांगत या शेजारी देशाबाबतची निराशा त्यांनी बोलून दाखवली. पाकिस्तानचा प्रश्न तर समोर आहेच. पण एकूणच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हाने इतकी पेचदार झाली आहेत की, त्यांना तोंड देण्यासाठी देशातील इतर नेते, तज्ज्ञ, अभ्यासक आदी अनेकांची मदत घ्यावी लागणार आहे. थोडक्यात, या प्रक्रियेतही ‘सब का साथ’ मिळविणे आवश्यक आहे.
या संवादात मोदी स्वतःविषयीही विस्ताराने बोलले आहेत. त्यात प्रकर्षाने जाणवलेले मोदी यांचे वेगळेपणही नोंदवायला हवे. भारतीय एकात्मतेला लाभलेले सांस्कृतिक परिणाम विशद करताना त्यांना रामायण, महाभारताची आठवण अगदी सहजपणे होते.
डॉ. राममनोहर लोहिया यांनी ‘भारतीयांच्या हृदयाचे स्पंदनच अनुष्टुभछंदात चालते’, असे म्हटले होते, त्याची आठवण हे निवेदन ऐकताना सहजच होते. मोदींनीदेखील भारतीय एकात्मतेची वीण घट्ट झाली आहे, ती सांस्कृतिक धाग्यांनीच, असे सांगितले. भारतीयांच्या मानसिकतेवर दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यामुळे वसाहतवादाचे जे सावट पडले, त्यातून सुटका करून घेणे ही बाब अवघड असते.
सार्वजनिक जीवनात पुढारपण करणाऱ्या अनेकांनाही ते जमलेले नाही. मोदी त्यापासून मुक्त आहेत, हे या मुलाखतीतून पुन्हा अधोरेखित झाले. त्यांचा कमालीचा आशावाद, सकारात्मक दृष्टिकोन ते केवळ सत्ताधारी आहेत, म्हणून तसा आहे, असे नाही, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग आहे, असे जाणवते.
सर्वच सत्ताधारी प्रसारमाध्यमांना सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला देतात. मोदीही त्याला अपवाद नाहीत. पण प्रसारमाध्यमांविषयी त्यांनीदेखील सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला काय हरकत आहे, असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.
पत्रकारपरिषद न घेण्याचा हट्ट त्यांनी ११ वर्षे केंद्रात सत्तेत राहिल्यानंतरही कायम ठेवला आहे. निदान आतातरी त्यांनी पत्रकारपरिषद जाहीर करून ‘सकारात्मक धक्का’ द्यायला हवा. चर्चा, संवाद, प्रश्न-उपप्रश्न, वाद-प्रतिवाद हे संसदीय लोकशाहीचे अविभाज्य भाग आहेत. हे साद-पडसाद उमटायलाच हवेत. ‘टीकेचे मी स्वागत करतो’, असे मोदी म्हणाले खरे; परंतु त्यांच्या या म्हणण्याला प्रत्यक्ष कृतीतून पुष्टी मिळायला हवी. या पॉडकास्टच्या निमित्ताने तशी अपेक्षा व्यक्त करणे औचित्याचे ठरेल.