सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन आज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी आज फेटाळला.
फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी साताऱ्यातील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय लक्ष्मणराव निकम, खासगी व्यक्ती किशोर संभाजी खरात, आनंद मोहन खरात व एका अनोळखी व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग करत आहे.
या गुन्ह्यातील संशयित निकम यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी फेटाळला होता. या निर्णयानंतर न्यायाधीश निकम यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती बोरकर यांच्यासमोर आज त्यावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यावर न्यायमूर्ती बोरकर यांनी निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.