इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरलं! ५ ते २३ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार; १ मे रोजी निकाल लावण्याचे शाळांसमोर आव्हान
esakal March 18, 2025 03:45 PM

सोलापूर : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार ५ ते २३ एप्रिलपर्यंत सकाळी ८ ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांचे पेपर घेतले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे.

२०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षाचा सध्या शेवटचा टप्पा सुरू असून अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात अंतिम तथा वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेतली जाणार आहे. त्यानुसार वेळापत्रक फायनल झाले आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहेत. त्याची ‘डायट’ किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कधीही पडताळणी होऊ शकते.

या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी फेरपरीक्षा घ्यावी लागते, जेणेकरून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देता येणार आहे. दरम्यान, परीक्षा २५ एप्रिलला संपणार असल्याने प्रत्येक शाळेला नेहमीप्रमाणे १ मे रोजी निकाल लावावा लागणार असून त्यादृष्टीने शिक्षकांना पेपर झाल्यावर लगेचच उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत.

परीक्षाचे असे आहे वेळापत्रक

  • दिनांक पाचवी सहावी-सातवी आठवी नववी

  • ५ एप्रिल -- -- -- मराठी

  • ७ एप्रिल -- -- -- इंग्रजी

  • ८ एप्रिल मराठी मराठी मराठी(पॅट) मराठी(पॅट)

  • ९ एप्रिल मराठी(पॅट) गणित इंग्रजी(पॅट) इंग्रजी(पॅट)

  • ११ एप्रिल इंग्रजी(पॅट) इंग्रजी गणित(पॅट) गणित भाग-१(पॅट)

  • १२ एप्रिल इंग्रजी हिंदी मराठी गणित भाग-१

  • १५ एप्रिल गणित विज्ञान इंग्रजी गणित भाग-२

  • १६ एप्रिल हिंदी समाजशास्त्र गणित विज्ञान भाग-१

  • १७ एप्रिल प.अभ्यास चित्रकला हिंदी विज्ञान भाग-२

  • १९ एप्रिल गणित(पॅट) मराठी(पॅट) विज्ञान गणित भाग-२(पॅट)

  • २१ एप्रिल चित्रकला गणित(पॅट) समाजशास्त्र हिंदी

  • २२ एप्रिल शा.शिक्षण शा.शिक्षण चित्रकला इतिहास

  • २३ एप्रिल -- इंग्रजी(पॅट) शा.शिक्षण भूगोल

विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपर्यंत शाळेत यावेच लागणार

दरवर्षी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत घ्यायच्या. पण, या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी लागल्यासारखीच स्थिती होती. परीक्षा झाल्यावर बहुतेक विद्यार्थी शाळेत येतच नसत. पण, आता सर्वच शाळांची परीक्षा ५ ते २५ एप्रिल या दरम्यान होणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा संपेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे. त्यानंतर १ मे रोजी नेहमीप्रमाणे निकाल जाहीर करण्याचे आव्हान शाळांच्या मुख्याध्यापकांसमोर असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.