Nilesh Lanke : गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प : खासदार नीलेश लंके
esakal March 18, 2025 05:45 PM

पारनेर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोटांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यापुढील काळात करण्यात येतील. तसेच गड संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प आज शिवजयंती निमित्ताने करण्यात आला असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंतीनिमित्त खासदार लंके यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार वर्षा गायकवाड, खासदार भास्कर भगरे, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार नरेश म्हस्के व खासदार बळवंत वानखेडे आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ते पुढे म्हणाले, नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवनेरीपासून सुरू करण्यात आलेल्या गडकोट आणि दुर्गसंवर्धन अभियानासंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांसमवेत चर्चा करण्यात आली. त्यावेळी गडकोट संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत, असे ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.