Matheran News : माथेरानला फिरायला जायचा विचार करत असाल तर प्लॅन करा कॅन्सल; आजपासून 'या'मुळे बेमुदत बंद
esakal March 18, 2025 11:45 PM

उन्हाता तडाखा वाढला आहे. थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी माथेरानला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तो आत्ताच कॅन्सल करा कारण आजपासून (मंगळवार) शहरात बेमुदत संप पाळण्यात येणार आहे. माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीकडून हा बंद पाळला जाणार आहे. पर्यटकांची होणारी लुबाडणूक रोखण्यास प्रशासन कानाडोळा करत असल्यानेच संघर्ष समितीने हा आवाज दिला असून त्याला हॉटेल इंडस्ट्री, ई-रिक्षा संघटना, व्यापारी, सामाजिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे असे समितीकडून सांगण्यात आले आहे.

थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. मुंबई, ठाणे, पुण्यापासून हे ठिकाण जवळ असल्याने पर्यटकांचा मोठा राबता माथेरानमध्ये असतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून माथेरानमध्ये पर्यटकांची लूट होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना फसवून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचा नवा धंदा काही दलालांनी सुरू केला होता. त्यात घोडेवाल्यांचाही समावेश असल्याचा आरोप माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केला आहे.

पर्यटक हाच माथेरानच्या अर्थव्यवस्थेचा गाभा आहे आणि त्याचीच बेसुमार लूट होणार असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा संघर्ष समितीने दिला. माथेरानमधील सर्व व्यावसायिक प्रशासनाविरोधात कडकडीत बेमुदत बंद पाळणार आहेत. या बंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.

माथेरान दस्तुरी प्रवेशद्वार येथे असलेल्या टॅक्सी स्टँड पासून लोखंडी डॉम पर्यंत एकही एजंट,घोडेवाले,हमाल,रिक्षा चालक यांनी येऊ नये.पर्यटकांनी प्रवासी वाहन कर भरल्यावर डोम मध्ये शेवटी माथेरान पालिकेचे माहिती केंद्र विविध प्रकारचे दरपत्रक असावे आणि त्यापुढे घोडे,रिक्षा,हात रिक्षा आणि हमाल यांचे प्रीपेड स्टॉल असावेत.जेणेकरून पर्यटकांना रीतसर माहिती मिळेल आणि पर्यटकांची फसवणूक होणार नाही. अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.