नीरा नरसिंहपूर, ता. १८ ः नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत करण्यात आलेल्या भूमिगत गटार लाईन कामांचा बोजवारा उडाला आहे. गावांतर्गत केलेल्या भूमिगत गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी उघड्यावरून वाहून नीरा व भीमा नद्यांमध्ये मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होत आहे.
येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नातून तिर्थक्षेत्र विकास आराखड्यास २६० कोटींचा निधी मंजूर झाला होता. आज ही सात ते आठ वर्षांनंतर त्यातील अनेक योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. तसेच, अनेक योजना पूर्ण होऊनही हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत.
गावात लोकसंख्येच्या प्रमाणाला पुरेल अशी भूमिगत गटारीचे काम केलेले नाही. छोट्या व कमी व्यासाच्या पाइप टाकण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये पाणी बसत नसल्याने पाणी चेंबरमधून उफाळून बाहेर पडल्याने रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त काळे पाणी वाहत आहे. पाण्याचा उग्र दुर्गंधीयुक्त वास व पाणी तुडविण्याची वेळ भाविक व नागरिकांवर आली आहे. तर श्री लक्ष्मी नृसिंहाचा दररोजचा प्रसाद व पूजा साहित्य जाणाऱ्या रस्त्यावरच ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. नरसिंह जयंती उत्सव मे महिन्यात असतो. यावेळी भाविकांना या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावात जवळपास १०० पेक्षाही अधिक चेंबर आहेत. यामधून अधून मधून पाणी उफाळत असते. सध्या मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरील व मुख्य चौकातील चेंबर तुबंल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. गावात सर्वत्र दुर्गधी पसरली असल्याने नागरिकांमध्ये या योजनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतीकडे त्याचे हस्तांतरण करण्यात आले नसल्याने दुरुस्ती कोणी करायची? याच्या प्रतिक्षेत सर्वांनाच त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
नीरा व भीमा नद्यांचे पाणी दूषित
शासनाने केलेली भूमिगत गटार योजनेचे काम अद्यापही अपूर्णच आहे. गटारीचे पाणी नदीत न सोडता त्यासाठी विहीर खोदली आहे. या विहिरीमध्ये पाणी सोडून नंतर त्यातून पाणी उचलून फिल्टर करून नदीत पाणी सोडले जाणार आहे. परंतु ठेकेदारांनी शेवटच्या टप्प्यातील कामच केले नसल्याने पाणी थेट नीरा व भीमा नद्यांत जाऊन मिसळल्याने प्रदूषण होत आहे.
याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या असून, ड्रेनेजचे काम दोन दिवसांत सुरळीत करण्यात येईल. पण अपूर्ण कामेही या आठवड्यात सुरू करण्यात येतील. तसेच, ड्रेनेज स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीला एक सक्शन मशिन देण्यात येईल. जेणेकरून इंटर चॉकअप झाल्यास मशिनने काढता येईल.
- किरण इंदलकर, जिल्हा नियोजन अधिकारी.
ड्रेनेज लाइनचे मेंटेनन्सचे काम माझ्याकडे नाही. तरीसुद्धा अनेकदा ते केले असून, स्वच्छता करणारी मशिन अकलूज येथून आणून आत्ताचे काम करणार आहे. कारण त्याचे काम मशिननेच करावे लागते.
- सदानंद जोशी, ठेकेदार.