51984
कामगारांच्या समस्या मार्गी लावा
मजदूर संघाची मागणी ः सिंधुदुर्गनगरीत धरणे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार व घरेलू कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी व त्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने आज भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याबाबतचे निवेदन आज त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे दिले.
निवेदनात म्हटले आहे की, घरेलू व बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तत्कालीन सरकारी कामगार अधिकाऱ्यांसमवेत डिसेंबर २०२४ मध्ये बैठक होऊन त्यामध्ये चर्चा केली होती. या बैठकीत प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊनही अद्यापही सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत. नोंदीत बांधकाम कामगारांना ठेकेदार एजन्सीमार्फत दिलेल्या प्रशिक्षणाचा ४२०० रुपये एवढा प्रशिक्षण भत्ता अद्याप बहुतांश जणांना मिळालेला नाही. कोरोना महामारी आर्थिक मदतीबाबत सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीची अद्याप संघटनेस माहिती मिळालेली नाही. तसेच कामगारांना न्याय मिळालेला नाही. अवजारे खरेदी करण्यासाठी ५ हजार रुपये अनुदानाचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही अद्याप झालेली नाही. घरेलू कामगारांना नोंदणीनंतर मिळणाऱ्या लाभाबाबतची कागदपत्रे संघटनेस मिळावी, अशी मागणी करूनही आजपर्यंत माहिती मिळालेली नाही. तसेच संसारोपयोगी भांडी संच वाटपाबाबत माहिती संघटनेस दिलेली नाही.’’
----
अद्याप भांडी संच वाटप नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप भांडी संच वाटप झाले नाही. अशाप्रकारे प्रलंबित राहिलेले लाभ तत्काळ घरेलू व बांधकाम कामगारांना द्यावेत. बनावट संघटना व एजंटांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय मजूर संघ सिंधुदुर्गतर्फे अध्यक्ष सत्यविजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन आज त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी ओंकार गुरव, हेमंतकुमार परब आदी पदाधिकाऱ्यांसह बांधकाम कामगार उपस्थित होते.