शहापूर, ता. १८ (वार्ताहर): वन कायदा २००६ नुसार आदिवासींनी दाखल केलेल्या वन दाव्यांना मंजुरी द्यावी, या मागणीसाठी वैतरणा मार्गावरील दहीगाव येथून हजारो आदिवासींनी खर्डी गावातील वन क्षेत्रपाल कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.१८) आंदोलन करण्यात आले.
वन कायदा २००६ नुसार १० एकर क्षेत्रापर्यंत जमीन देण्याची तरतूद आहे, परंतु कायद्यानुसार दाखल दावे वन विभागाने गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे पाणी, वीज आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वाड्यावस्त्यांमध्ये राहणारे आदिवासी वंचित आहेत. त्यामुळे शेतीचे, घराचे व गावठणाचे वनदावे मंजूर करून वनपट्टे देण्यात यावे, दहिगाव ते बेलनाला गावाच्या रस्त्यामधील मोऱ्या टाकून रस्त्याचे काम चालू करा, मंजूर घरकुले तत्काळ बांधण्यास परवानगी द्या, दहिगाव ग्रामपंचायतीमधील तलवाडा, शिसवली, मानाचाआंबा, तुंबडेपाडा, काहडोलपोही, वरातेपाडा येथे मंजूर वीजवाहिन्या उभ्या करण्यास परवानगी द्यावी, रोजगार हमीच्या कामांची निर्मिती करून आदिवासींच्या हाताला रोजगार द्यावा, वनपट्टेधारकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेऊ द्यावा, तानसेत खरबेपाडा येथे एकसाली भूखंडावरील बांधकामे त्वरित बंद करून जमिनी मूळ मालकाच्या ताब्यात द्यावी, अशा विविध मागण्या बिऱ्हाड मोर्चातून करण्यात आल्या.