चेन्नई सुपर किंग्स, हे इंडियन प्रीमियर लीगमधील नेहमीच गाजणारे नाव आहे. सर्वात यशस्वी संघांपैकी असलेला हा संघ यंदा १८ व्या हंगामात सहावे विजेतेपद जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत.
चेन्नईने आता ऋतुराज गायकवाडच्या नाववरच कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्येही ऋतुराज चेन्नईचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. त्याला या हंगामातही एमएस धोनीची साथ मिळणार आहे. धोनी संघात असणं चेन्नईसाठी दिलासा देणारे आहे. त्याला ४ कोटी रुपयांना संघात रिटेन केलं आहे.
चेन्नईसाठी गेल्यावर्षी प्लेऑफमधील स्थान अगदीच थोडक्यात गमवावे लागले होते. ते ५ व्या क्रमांकावर राहिले होते. चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश न करण्याची ही तिसरीच वेळ होती. पण आत्तापर्यंत चेन्नईचा इतिहास असा राहिला आहे की त्यांच्याकडून पुनरागमनात दमदार कामगिरी झाली आहे.
त्यांनी गेल्या ५ हंगामात दोनदा प्लेऑफ गाठली आहे आणि थेट विजेतेपदाला गवसणी घातली आहे. तीन वेळा त्यांना प्लेऑफमध्येच पोहचता आले नव्हते. तसेच आत्तापर्यंत असं कधीही झालेलं नाही की सलग दोन हंगामात धोनी आयपीएलचा अंतिम सामना खेळलेला नाही, त्यामुळे हा इतिहास पाहाता चेन्नईकडून यावर्षी मोठ्या अपेक्षा आहेत.
त्यातच आता हा धोनीचा अखेरचा हंगाम ठरणार का अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे असे असेल, तर चेन्नई संघ त्याला विजयी निरोप देण्यास उत्सुक असेल.
चेन्नईची ताकदचेन्नईने ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रविंद्र जडेजा आणि एमएस धोनी या खेळाडूंना लिलावापूर्वीच कायम केले होते. याशिवाय त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्याकडून खेळलेल्या रचिन रविंद्रलाही आरटीएम कार्ड वापरून संघात घेतले आहे.
त्याचबरोबर डेवॉन कॉनवे, शेख राशिद, मुकेश चौधरी यांनाही संघात पुन्हा घेण्यात चेन्नई यशस्वी ठरले आहेत. त्याचबरोबर आर अश्विन आणि सॅम करन यांचेही चेन्नई संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे एकूणच चेन्नईचे प्रमुख खेळाडू आधीच संघात आहेत. अशात त्यांना संघ बांधण्यासाठी सोपे जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा त्यांच्या संघात दुखापतीच्या चिंता कमी आहेत.
चेन्नईची सर्वात जमेची बाजू त्यांच्याकडे असलेले गोलंदाजीचे पर्याय ही आहे. फिरकी गोलंदाजीसाठी संघात रविंद्र जडेजा, नूर अहमद, श्रेयस गोपाळ, आर अश्विन हे खेळाडू आहेत, याशिवाय रचिन रवींद्र, दीपक हुडा हे फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू संघात आहेत. तसेच त्यांचं घरचं मैदान असलेल्या चेपॉक स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे या खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
वेगवान गोलंदाजीसाठी मथिशा पाथिराना, अंशुल कंबोज, नॅथन एलिस, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग हे खेळाडू आहेत, त्यांच्या साथीला शिवम दुबे, सॅम करन, विजय शंकर, जॅमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष हे वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू संघात आहेत. त्यामुळे गोलंदाजीसाठी भरपूर पर्याय चेन्नईकडे आहेत, जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजीसाठी तयार असू शकतात.
चेन्नई संघाकडे चांगली गोलंदाजी असली तरी मधल्या फळीत त्यांच्याकडे फलंदाजीची समस्या दिसत आहे. त्यांच्याकडे ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र हे वरच्या फळीत खेळणारे फलंदाज आहेत. मधल्या फळीसाठी त्यांच्याकडे राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, विजय शंकर, दीपक हुडा यांचा विचार करावा लागणार आहे.
त्रिपाठी भरवशाचा फलंदाज असला, तरी सध्या चौघांच्या फॉर्मचीही चिंता आहे. चेन्नईकडे अष्टैपैलू म्हणून खेळण्यासाठी बाकी चांगले पर्याय आहेत. तसेच तळात एमएस धोनीही काही चेंडू खेळण्यासाठी ७ किंवा ८ व्या क्रमांकावर येण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्यांना मधल्या फळीतील फलंदाजीची समस्या सोडवावी लागेल.
अशी असू शकते चेन्नईची संभावित प्लेइंग इलेव्हनडेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, रचीन रविंद्र, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा/विजय शंकर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, आर अश्विन, खलील अहमद, सॅम करन/नूर अहमद/नॅथन एलिस, मथिशा पाथिराना (इम्पॅक्ट प्लेअर)
चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ -रिटेन केलेले खेळाडू - ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथिशा पाथिराना (१३ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी), रविंद्र जडेजा (१८ कोटी) आणि एमएस धोनी (४ कोटी)
लिलावातून घेतलेले खेळाडू - आर अश्विन (९.७५ कोटी), डेवॉन कॉनवे (६.२५ कोटी), खलील अहमद (४.८० कोटी), रचिन रविंद्र (४ कोटी RTM), राहुल त्रिपाठी (३.४० कोटी), विजय शंकर (१.२० कोटी), नूर अहमद (१० कोटी), अंशुल कंबोज (३.४० कोटी), सॅम करन (२.४० कोटी), गुरजपनीत सिंग (२.२० कोटी), नॅथन एलिस(२ कोटी), दीपक हुडा (१.७० कोटी), जॅमी ओव्हरटन (१.५० कोटी), विजय शंकर (१.२० कोटी), वंश बेदी (५५ लाख), श्रेयस गोपाळ (३० लाख), रामकृष्ण घोष (३० लाख), कमलेश नागरकोटी (३० लाख), मुकेश चौधरी (३० लाख), शेख राशिद (३० लाख)
२३ मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई (संध्या. ७.३० वा.)
२८ मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई (संध्या. ७.३० वा)
३० मार्च - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, गुवाहाटी (संध्या. ७.३० वा)
५ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई (दु. ३.३० वा)
८ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चंदिगढ (संध्या. ७.३० वा)
११ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई (संध्या. ७.३० वा)
१४ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स,लखनौ (संध्या. ७.३० वा)
२० एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई (संध्या. ७.३० वा)
२५ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई (संध्या. ७.३० वा)
३० एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, चेन्नई (संध्या. ७.३० वा)
३ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू (संध्या. ७.३० वा)
७ मे - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता (संध्या. ७.३० वा)
१२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, चेन्नई (संध्या. ७.३० वा)
१८ मे - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अहमदाबाद (दु. ३.३० वा)