'LORD' ठाकूर! अनसोल्ड राहिलेला शार्दूलची IPL 2025 मध्ये होणार एन्ट्री? 'या' संघासाठी देवासारखा धावला, सोबत शिवमही
esakal March 19, 2025 02:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा ४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात सर्व संघांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. जवळपास सर्व खेळाडूही आपापल्या संघात दाखल झाले आहेत. मात्र, असे असतानाच लखनौ सुपर जायंट्सला मात्र मोठी चिंता आहे. अद्याप संघात कोणते गोलंदाज खेळणार आहे, हेच निश्चित नाही. कारण संघातील अनेक गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत.

लखनौने संघात रिटेन केलेला मयंक यादव, मोहसीन खानसह लिलावातून घेतलेले आकाश दीप, आवेश खान, या चौघांच्याही तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह आहे.

मंयक आणि आकाश दोघेही बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहेत. मयंकने गोलंदाजीला सुरुवात केली आहे, पण तो अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाठीची दुखापत झालेला आकाश दीपही अद्याप पूर्ण बरा झालेला नसून पहिल्या काही सामन्यांना मुकणार आहे.

आवेश खान फिट झाला असल्याचे सांगण्यात येत आहे, पण तो अद्याप संघात दाखल झालेला नाही. मोहसिनला काही दिवसांपूर्वी पोटरीला दुखापत झाली आहे. अशात आता जोखीम घेऊन या चौघांनाही संघात ठेवायचे की त्यांच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूंना संघात संधी द्यायची हा विचार लखनौच्या मॅनेजमेंटला करावा लागणार आहे.

लखनौकडे शार्दुल ठाकूर आणि शिवम मावी यांचे पर्याय आहेत. हे दोघे गेले काही दिवस लखनौच्या कॅम्पमध्ये नेट्समध्ये सरावही करत आहेत. त्यांना आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. अशात त्यांचा लखनौ संघ विचार करू शकतात.

दोघांनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा आणि आयपीएलचाही चांगला अनुभव आहे. याशिवाय दोघेही वेगवान गोलंदाजीसोबत फलंदाजीतही योगदान देऊ शकतात.

शार्दुलने नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीत फलंदाजी करतानाही कमाल केली होती. तसेच गोलंदाजीतही त्याने प्रभावी कामगिरी केली होती. पण त्याने आयपीएलमध्ये संधी न मिळाल्यानंतर एसेक्स या काऊंटी संघाशी करार केला होता. त्यामुळे आता पुढे कशा गोष्टी घडणार, हे पाहावे लागणार आहे.

खरंतर लखनौने भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये लिलावावेळी मोठी गुंतवणूक केली होती. त्यांनी शामर जोसेफ आणि मिचेल मार्श या दोन परदेशी वेगवान गोलंदाजांना संघात संधी दिली आहे.

मात्र मार्श देखील दुखापतीमुळे फक्त फलंदाजीसाठीच उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे फक्त जोसेफचा पर्याय त्यांच्याकडे आहे. अशात आता भारतीय वेगवान गोलंदाज दुखापतीचा सामना करत असल्याने आता लखनौला लवकरच याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

लखनौन भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानला मेंटॉर म्हणून नियुक्त केले आहे. पण त्याच्यासमोर सुरुवातीलाच मोठे आव्हान आहे. त्याला आता मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे की शार्दुर ठाकूर आणि शिवम मावीला दुखापतग्रस्त गोलंदाजांच्या जागेवर घ्यायचं की ते खेळाडू तंदुरुस्त व्हायची प्रतिक्षा करायची.

लखनौने आयपीएल लिलावात २७ कोटी रुपयांना संघात घेतलेल्या रिषभ पंतकडे यंदा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे यंदा तो आयपीएल २०२५ मध्ये लखनौचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.