नागपूरच्या प्रकरणानंतर मंत्री नीतेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याची चर्चा आहे. त्यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावरील चर्चेवर नीतेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या प्याद्यामधील मी एक आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे. त्यामध्ये नीतेश राणेंचे नाव आहे. त्यामुळे कोणाला चिंता करण्याची गरज नाही, अशी स्पष्टोक्ती दिली.
ते म्हणाले, की नागपूर येथे घडलेली घटना लक्षात घेता एकंदरीत ही घटना सुनियोजित कट असल्याचे पुढे येत आहे. काही गोष्टी ठरवून करण्यात आल्या आहेत. पोलिसांवर हल्ला करा, असे कोणत्या घटनेत लिहिले आहे, असा सवाल नीतेश राणे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितल्याप्रमाणे आता प्रश्न उद्भवला आहे की, हिंसाचारासाठी ट्रॉली भरून दगड आले कोठून? त्यामुळे आता पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कशी कारवाई होते ते पाहाच, असा इशाराही राणे यांनी दिला.
‘येत्या गुरुवारी मी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे पहिले आमंत्रण मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देईन. मत्स्य खात्याचा मंत्री असल्याने माझी निमंत्रणपत्रिका देखील माशाच्या आकाराची आहे,’ असेही राणे यांनी सांगितले.