राज्यातील सर्व ओबीसी समाजाने आपल्यालाच मतदान केल्याचा दावा करणाऱ्या महायुतीने ओबीसी महामंडळाला केवळ ५ कोटी रुपये देऊन या समाजाची घोर फसवणूक केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळ यांनीदेखील ओबीसी समाजासाठी करण्यात आलेल्या तरतुदीवर नाराजी व्यक्त केली. अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘राज्याचा अर्थसंकल्प झाला, मात्र त्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एक रुपयाचीदेखील तरतूद नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा तर संशोधनाचा विषय आहे. ठराविक कंपन्यांनाच निविदा दिल्या जात आहेत. त्यांच्या सोयीच्या अटीशर्ती घातल्या जात आहेत.
मेघा इंजिनिअरिंग, नवयुग याच कंपन्यांना आलटून-पालटून काम दिले जात आहे,’ असा आरोप त्यांनी केला. तसेच अनेक निविदा ३५ ते ४० टक्के जादा किंवा कमी दराने भरल्या जात आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
छगन भुजबळ म्हणाले, ‘राज्य सरकारने सर्व समाजांना समान न्याय देण्याचे तत्त्व ठरवले असताना, त्याला हरताळ फासला जात आहे. सारथी, बार्टी या संस्थांना महाज्योतीच्या तुलनेत अधिक निधी दिला जात आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळाला ७५० कोटींची तर ओबीसी महामंडळाला केवळ ५ कोटींची तरतूद का, इतरांना निधी मिळत असल्याचे अजिबात दुःख नाही. मात्र ओबीसींना देखील समान संधी द्या,’ अशी मागणी त्यांनी केली.
शहाजी महाराज यांची समाधी बांधावी
शहाजी महाराज यांचा कर्नाटक येथील दावणगिरी येथे मृत्यू झाला. त्याठिकाणी त्यांची अत्यंत साधी समाधी आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे समाधी बांधावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.