'पुरातत्त्वा'चा अभ्यास ही संयमाची कसोटी!
esakal March 19, 2025 12:45 PM

- ऋत्विज आपटे, पुरातत्त्वज्ञ

माणसाला त्याचा इतिहास पक्का ठाऊक असला की, भविष्याची आखणी चांगल्या पद्धतीने करू शकतो असं म्हणतात. इतिहासाचा अभ्यास सूक्ष्म रीतीने आणि संस्कृतीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी, मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्त्वशास्त्राची मदत घ्यावी लागते. त्यामुळे या क्षेत्रात काम करणं जितकं रंजक, नावीन्यपूर्ण तितकंच ते जबाबदारीचं असतं

पुरातत्त्व क्षेत्रात यावं असं केव्हा वाटलं?

माझं लहानपण पेणमध्ये गेलं. त्या वेळी मला पुरातत्त्वशास्त्राची काहीच माहिती नव्हती. मात्र, इतिहास, भूगोल या विषयात आणि एकूणच समाजशास्त्राचा अभ्यास करायला आवडायचं. मुंबईत आल्यावर याबद्दल अधिक माहिती मिळाली. मी कॉमर्स सोडून कला शाखेत प्रवेश घेतला. पुरातत्त्वशास्त्राला पूरक ठरणारा विषय या हेतूने संस्कृतमध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर पुरातत्त्वशास्त्रात शिक्षण घेतलं.

पुरातत्त्वशास्त्रात येण्यासाठी कोणती कौशल्ये अंगी असायला हवीत?

महत्त्वाचं कौशल्य, गुण अंगी असायला हवा, तो म्हणजे-कमालीचा संयम. एखाद्या गोष्टीचा, संस्कृतीचा अभ्यास करताना खूप वेळ अभ्यास करावा लागतो, उन्हातान्हात प्रवास होतो, आर्थिक मोबदला फारसा मिळत नाही, कदाचित अपेक्षित निष्कर्षही मिळत नाहीत.

अशा वेळी टिकून राहण्यासाठी लागतो, तो संयम! तसंच, खूप नवीन गोष्टी, माणसे, निरीक्षणे समोर येतात. त्या वेळी त्यांना समजून घेण्याची क्षमता हवी. प्रचंड वाचन करण्यासाठी अभ्यासाची बैठक हवी. शारीरिक, मानसिक ‘फिटनेस’ आवश्यक असतो. डोंगरदऱ्यात किंवा एखाद्या अनोळखी परिसरात पायपीट करण्याची क्षमता हवी.

पुरातत्त्वशास्त्रात प्रवेश करण्याआधी काय तयारी करायला हवी?

कोणत्याही शाखेचा पदवीधर एम.ए. पुरातत्त्वशास्त्र यासाठी प्रवेश घेऊ शकतो. त्यानंतर त्याचा अभ्यास व या क्षेत्रातील काम सुरू होतं. मात्र, त्याआधी तुम्ही इतिहास, भूगोलाचा अभ्यास केला असेल, संस्कृतचं काही वाचन केलं असेल, तर पुढील गोष्टी सोप्या होऊ शकतात. काही चित्रपटांमध्ये पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास किंवा ते काम याला खूप रंगवून दाखवलं जातं.

प्रत्यक्षात तसं अजिबात नसतं. त्यामुळे केवळ बाह्यरंगावर भुलून जाऊ नका. तुम्हाला कोणत्या काळाचा, कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायला आवडतो? याचा अंदाज घ्या आणि मग त्यावर काम सुरू करा. सिंधू संस्कृती, मराठाकालीन इतिहास वगैरे असे अनेक विषय यात आहेत. त्यापैकी आपली आवड ओळखा, त्यासाठी अवांतर वाचन करा.

कोणकोणत्या प्रकल्पांसाठी काम केलं आहेस?

महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचलनालयासोबत मी काही वर्ष काम केलं आहे. गेल्या ८ वर्षांपासून मी कोकणातील कातळशिल्पांवर काम करतो आहे. याशिवाय राखीगढी, कोळोशी, सिंधुदुर्ग यांसारख्या ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये सहभाग घेतला असून, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, मिझोराममध्येही विविध प्रकल्पांसाठी काम केलं आहे. निसर्गयात्री संस्थेच्या वतीने आमचं काम सुरू आहे. सध्या मी मुंबई विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करतो आहे.

‘पुरातत्त्वा’त शिरताना...

  • नाटक, चित्रपटातील दिखाव्यावर भाळून या क्षेत्रात येऊ नका. स्वतःला ओळखा.

  • या क्षेत्रात संधींना मर्यादा असल्या, तरी काही तरी वेगळं ‘क्लिक’ झाल्यास चांगलं काम होऊ शकतं.

  • काही तरी नवीन शोधण्याचा आनंद, समाधान हे क्षेत्र नक्की देतं.

(शब्दांकन : मयूर भावे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.