आयपीएल स्पर्धेत खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. कारण जगभरातील श्रीमंत लीगपैकी ही एक स्पर्धा आहे. यात कोट्यवधि रुपयांची उधळण होते. तसेच दिग्गज खेळाडूंच्या सान्निध्यात खेळण्याची संधी मिळते. या स्पर्धेत तारे चमकले तर भविष्यात पाठी वळून पाहण्याची गरज भासत नाही. असं असताना दक्षिण अफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशचं नशिब असंच चमकलं. त्याला मुंबई इंडियन्सकडून तगडी ऑफर मिळाली आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला सोडचिठ्ठी दिली. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अपमान झाल्यासारखं वाटलं आहे. त्यामुळे बॉशची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला नोटीस पाठवली होती. त्या नोटीशीला आता बॉशने त्याच शब्दात उत्तर दिलं आहे. बॉशने सांगितलं की, “मला माझ्या भविष्यासाठी एक चांगला निर्णय घ्यावा लागला.”
मिडिया रिपोर्टनुसार,पेशावर झल्मी आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी त्याला जवळजवळ समान पगार दिला. पण तरीही त्याने आयपीएलची निवड केली. पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर झल्मी संघाने मला ५०-७५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने मला ७५ लाख रुपयांना खरेदी केले. या फ्रँचायझीमध्ये सामील झाल्याने त्याच्या कारकिर्दीत नवीन संधी उपलब्ध होतील, असं कारण देत आयपीएलमध्ये सहभागी झाल्याचं बॉशने सांगितलं. त्यामुळे पीएसएल फ्रँचायझींनी बॉशविरुद्ध कारवाई करण्यासाठी पीसीबीवर दबाव आणला आहे. हॅरी ब्रुकवर बीसीसीआयने ज्याप्रमाणे बंदी घातली, त्याचप्रमाणे बॉशवर बंदी घालण्याची मागणी पीएसएल फ्रँचायझी करत आहेत. पण यामुळे विदेशी खेळाडू स्पर्धेकडे पाठ फिरवतील याची भीती पीसीबीला सतावत आहे.
मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्याने त्याला केवळ आयपीएलमध्येच नव्हे तर इतर लीगमध्ये खेळणाऱ्या मुंबईच्या इतर फ्रँचायझींमध्येही खेळण्याची संधी मिळू शकते. कॉर्बिन बॉश विविध लीगमध्ये अनेक भारतीय फ्रँचायझींसाठी खेळतो. तो एमआय केपटाऊन, बार्बाडोस रॉयल्स, पार्ल रॉयल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्सकडूनही खेळला आहे. टी २० लीग स्पर्धेत ५९ विकेट्स घेतल्या तर २ अर्धशतकांसह ६६३ धावाही केल्या आहेत.