नागपुरात सोमवारी (17 मार्च) रात्री दोन गटातील वादातून हिंसाचाराची घटना घडली. शहरातील महाल भागात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली.
पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून शांतता राखण्याचं आवाहन सर्वसामान्यांना केलं आहे.
नागपूर पोलिसांनी घटनेच्या रात्री उशिरा एक वाजेपर्यंत चिटणीस पार्क परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. यात जवळपास 27 संशयितांना ताब्यात घेतलं आणि असून, सध्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीय.
मंगळवारी (18 मार्च) 27 संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुलताना मैमुना यांच्या कोर्टात रात्री 3 वाजेपर्यंत सुनावणी सुरूच होती.
त्यानंतर 27 पैकी 10 आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि उर्वरीत 17 आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आणखी काही आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
नागपूर हिंसाचारानंतर गणेशपेठ पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र गाडगे यांनी तक्रार दिली आहे. या एफआयआरमध्ये नेमके काय आरोप करण्यात आले आहेत?
4.पोलीस ठाण्यात आलेल्या या लोकांनी 17 मार्चला सांयकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुस्लीम धर्मातील लोकांना एकत्र जमवून हिंदू-मुस्लीम वाद होण्याच्या उद्देशाने कट कारस्थान रचलं आणि जवळपास 500 ते 600 मुस्लीम लोक छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले.
5. या जमावाला आपापल्या घरी जाण्याचं आवाहन करण्यात आलं. तरीदेखील हे लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी देत पोलिसांना बघून घेऊ अशा घोषणा देत पोलिसांच्याविरोधात जमावाला भडकवण्यात आलं.
6. ते कुऱ्हाड, दगड, लाठी, काठी घेऊन हजर होते. घातक शस्त्र हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला
7. या जमावाने भालदारपुरा परिसरात पोलिसांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने हल्ला केला.
8. भालदारपुरा परिसरात अंधाराचा फायदा घेत आर. सी. पी. पथकातील महिला पोलिस अंमलदाराला विवस्त्र करण्याच्या उद्देशानं गणवेश आणि शरीराला वाईट स्पर्श केला. तसेच इतर महिला पोलिसांवर अश्लील हातवारे आणि शिवीगाळ केली.
9. या जमावाने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. गीतांजली चौक परिसरात पोलिसांवर मागून पुढून दगडफेक करत दोन सी आर मोबाईल्स वाहनं जाळली. गाड्यांवर पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्यात आलं. गंजीपेठ परिसरात फ्लाय ओव्हरच्या कामासाठी उभ्या असलेल्या दोन क्रेन पेट्रोल बॉम्ब टाकून जाळल्या.
10. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना घातक शस्त्राने आणि दगडांनी जखमी केले.
औरंगजेब कबर आणि हिंसाचारावर संघाची भूमिकामहाराष्ट्रात औरंगजेबावरील वाद आणि नागपूरमध्ये त्याच्या कबरीवरून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (आरएसएस) आपली भूमिका स्पष्ट केली असून मुघल बादशाह आजच्या काळात प्रासंगिक नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत औरंगजेबवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर म्हणाले, "मला वाटतं की, आजच्या काळात तो वाद प्रासंगिक नाही. समाजासाठी कोणत्याही प्रकारची हिंसा चांगली नाही.''
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (एबीपीएस) तीन दिवसीय परिषदेच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत आंबेकर बोलत होते. नागपुरातील हिंसाचाराच्या कारणांचा पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठवड्यात आरएसएसच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. यावर भाष्य करण्यास आंबेकर यांनी नकार दिला.
पंतप्रधानाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या दौऱ्यात काहीच विशेष नाही, असं ते म्हणाले.
"पंतप्रधानांचं स्वागत आहे. अटलबिहारी वाजपेयीही संघाच्या मुख्यालयात गेले होते,'' असं त्यांनी सांगितलं.
संघाच्या शाखांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या (एबीपीएस परिषदेच्या शेवटी याबाबतचे आकडे जाहीर करेल) कमी होत असल्याबाबतचा प्रश्न आंबेकर यांनी फेटाळून लावला.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. फडणवीस म्हणाले, "मी सातत्याने पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहे. नागपूर शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारं शहर आहे. हीच नागपूरची परंपरा आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा."
हिंसाचार घडलेल्या ठिकाणी आता काय स्थिती?नागपुरात जिथं हिंसाचार झाला, त्या ठिकाणी जाऊन काय स्थिती आहे, याचा आढावा घेतला. तिथे दिसलेली स्थिती अशी आहे :
नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. संचारबंदी लागू असल्याने इथले सगळे दुकानं बंद आहेत. गांधी गेटपासून तर अग्रसेन चौक, सक्करदरा, गणेशपेठसह सर्व मध्य नागपूरच्या परिसरात संचारबंदी लागू आहे. हा परिसर बाजारपेठेचा असल्याने व्यावसायिकांवर आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांवर परिणाम झालाय.
नागपुरात पहिल्यांदाच असा हिंसाचार झाला आहे. ज्या परिसरात हे घडलं तिथले लोकही हे कसं काय घडलं, याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.
"आम्ही आमच्या परिसरात हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहतो, काही झालं तर आमचे नातेवाईक येण्याआधी आम्ही एकमेकांच्या मदतीला धावतो, मग आमच्या भागात असं कसं घडलं? बाहेरून येणारे हिंसा घडवून जातात आणि नुकसान आमच्या स्थानिकांच होतं," असे एक दुकानदार बोलत होते.
सकाळी सगळीकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. ज्या गल्ल्यांमधून दगडफेक झाली होती, त्या पत्र्याचे शेड लावून बंद करण्यात आल्या आहेत. काही दुकानाची तोडफोड केली आहे, तर इथे 2 वाहने सुद्धा जाळली आहेत. टायर पेटवल्याने रस्त्यावर सगळं तेल सांडलेले आहे. लोकांच्या घरावर दगडफेक झाली, एका घराचे सीसीटीव्ही फोडण्यात आले.
सध्या परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी म्हटले आहे.
"काही ठिकाणी जाळपोळ झाली आहे. दोन वाहने जाळण्यात आली असून दगडफेक देखील झाली. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत," असे पोलीस आयुक्त सिंघल यांनी म्हटले आहे.
नागपूर शहरात कलम 144 लागू करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त सिंघल यांनी सांगितलं.
नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल वृत्तसंस्था एएनआयला म्हणाले, "सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. एक फोटो जाळण्यात आला होता, त्यानंतर लोक जमले. त्यांनी विनंती केली आणि आम्ही त्यासंदर्भात कारवाई देखील केली. ते माझ्या कार्यालयात मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी दिलेल्या नावांच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
"ही घटना आज (17 मार्च) संध्याकाळी आठ-साडेआठच्या सुमारास घडली. यात दोन वाहनं जाळण्यात आली असून दगडफेक देखील झाली आहे. पोलीस तपास करत आहेत आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली जात आहे," असे सिंघल यांनी सांगितले.
"आम्ही कलम 144 लागू केले आहे आणि सर्वांना अनावश्यकपणे बाहेर पडू नये किंवा कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. या परिसर वगळता संपूर्ण शहरात परिस्थिती शांत आहे", असं सिंघल यांनी सांगितलं.
'गैरसमजामुळे घडली घटना'नागपूर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अर्चित चांडक यांनी माहिती दिली आहे.
अर्चित चांडक म्हणाले की, "ही घटना गैरसमज किंवा चुकीच्या संवादामुळे घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आमचं इथलं पोलीस दल भक्कम आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की घराबाहेर पडू नका किंवा दगडफेक करू नका. दगडफेक होत असल्यामुळे आम्हाला बळाचा वापर करावा लागला. तसंच अश्रुधुराचा देखील वापर करावा लागला."
"इथे काही वाहनं जाळण्यात आली. अग्निशमन दलाला बोलावून आम्ही आग विझवली आहे. काही पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. दगडफेक होत असताना माझ्या पायालादेखील छोटी दुखापत झाली आहे," चांडक म्हणाले.
"मात्र सर्वांनाच आम्ही शांतता राखण्याचं आवाहनं करतो. अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा आणि सुव्यवस्था मोडू नका. पोलिसांना सहकार्य करा. या घटनेसंदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत," असं चांडक म्हणाले.
केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.
"नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या शांततेचा इतिहास हे नेहमीच नागपूरचं वैशिष्ट्यं राहिलेलं आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता प्रस्थापित करावी आणि रस्त्यावर येऊ नये. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेला सहकार्य करावं," असं गडकरी म्हणाले.
"सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे, त्या पंरपरेनुरुप वर्तणूक ठेवावी. ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी बेकायदेशीर कृत्यं केली असतील, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, असा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो.
"माननीय मुख्यमंत्र्यांनीदेखील यासंदर्भातील सर्व माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं, सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी. पोलिसांना मदत करावी अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे," असं नितीन गडकरी म्हणाले.
नागपुरच्या महाल परिसरात आज (17 मार्च) संध्याकाळी तोडफोड आणि दगडफेकीची घटना झाली होती. त्यानंतर ही तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं आहे.
घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.
'..त्यांची तत्काळ हकालपट्टी करा'बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची आणि समाजात द्वेष पसरवणाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करावी असे काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी म्हटले आहे.
"नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळ मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी," असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, "जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत.नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी."
वारिस पठाण यांच्याकडून निषेध व्यक्तया घटनेचा MIM नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी निषेध केला आहे. "नागपुरात जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली आहे. अशा कुठल्याही हिंसाचाराच्या घटनांचा आम्ही पूर्णतः निषेध करतो. प्रत्येकानं कायदा व सुव्यवस्थेचं कसोशीनं पालन करायला हवं. परंतु, ही घटना कशी घडली? यामागचं कारण काय, याबाबत प्रशासनानं चौकशी करायला हवी.
"महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांची परिस्थिती बघितल्यास लक्षात येईल की, भाजपचे काही द्वेष पसरवणारे चिंटू आले आहेत, जे द्वेषपूर्ण भाषणबाजी करत सौहार्द बिघडवून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर शासनानं लगाम कसायची गरज आहे. महाराष्ट्रात तणावपूर्ण स्थिती निर्माण व्हावी, अशी काहींची इच्छा दिसून येत होती आणि तसंच घडताना दिसत आहे.
"औरंगजेबच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण करून इतर महत्वपूर्ण मुद्यांकडे पाठ फिरवली जात आहे. सर्वांनी कायद्याचं पालन करावं, आणि जे कोणी या परिस्थितीला जबाबदार आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही, हीच आमची सरकारकडे मागणी आहे," असं वारिस पठाण म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)