चिपळूण - गोवळकोट मोहल्ला येथील तरुण गोवळकोट वाशिष्ठी नदीपात्रात बुडाला. भरतीच्या पाण्यात अंदाज न आल्याने हा अपघात घडला. स्थानिक बोट चालकांच्या मदतीने जवळपास अर्ध्या तासाच्या शोधानंतर तरुणाचा मृतदेह हाती लागला. तलहा मन्सूर घारे (वय १५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार तलहा मन्सूर घारे (वय १५) हा मुलगा आपल्या अन्य चार मित्रांसोबत वाशिष्ठी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. वाशिष्ठीला उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तो बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेले इतर मित्र घाबरले. त्यामुळे त्याला वाचवायला कोणीही पुढे गेले नाहीत.
घाबरलेल्या अवस्थेत त्यानी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जवळच असलेल्या बोटी सोडून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. जवळपास अर्ध्या तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. चिपळूण पोलिस निरीक्षक मेंगडे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध कामात सहकार्य केले.