Disha Salian: मोठी बातमी! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी वडिलांची याचिका, आदित्य ठाकरेंची चौकशी होणार?
esakal March 20, 2025 05:45 AM

मुंबईः दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला, असा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं जात होतं. त्यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आवाज उठवला होता. राणेंनी आदित्य ठाकरे यांचं नाव या प्रकरणाशी जोडलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे.

यापूर्वी दिशाच्या वडिलांनी या प्रकरणी आपली काहीही तक्रार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु आता अचानक अशी याचिका दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दिशाच्या वडिलांचे गंभीर आरोप

किशोरी पेडणेकर यांनी नजरकैदेत ठेवलं

तपासादरम्यानचे पुरावे खरे मानण्यात भाग पाडलं गेलं

मुंबई पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोप

याप्रकरणी मंत्री नितेश राणे म्हणाले की, मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतोय. दिशा सालियनचा खून झाला होता. आदित्य ठाकरेंचं ८ जूनचं मोबाईल लोकेशन तपासा, तिथल्या वॉचमनचं काय झालं? हे मी विचारत होतो. आज तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे आता काय बोलणार? आता तर थेट तिच्या वडिलांनीच गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे.

दिशाच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोर्यांवर आरोप करण्यात येत होते. त्यामुळे या प्रकरणी आता यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

कोण आहे दिशा सालियन?

मुंबईत एका कंपनीत टॅलेंट मॅनेजर म्हणून कार्यरत असणाऱ्या हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा खाली पडली होती.

या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यानंतर दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड  यानेदेखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.