- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
स्त्री असो व पुरुष, सगळ्यांनाच आत्मविश्वासाचा अभाव जाणवू शकतो; परंतु तुमच्या माझ्यासारख्या महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव ही एक गंभीर समस्या आहे. स्त्रियांना विविध जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, बरेचदा आत्मविश्वासाचा अभाव ही आपल्यासाठी मोठी समस्या ठरते आणि त्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणात होतो.
आता महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव का असतो? महिलांवर कायमच सामाजिक आणि सांस्कृतिक बंधने घातली जातात. अगदी कसे बोलावे, वागावे यापासून, नोकरी, व्यवसाय करावा की नाही, कुठला करावा अशी एक न अनेक बंधने असतात. त्यामुळे स्वतःबद्दल शंका निर्माण होते.
आपल्याकडे कौशल्य, क्षमता आहे, हे लक्षात घेण्याऐवजी आपण स्वतःला कमी लेखत राहतो. अनेक घरांमध्ये स्त्रियांना शिक्षणाच्या संधीसुद्धा मर्यादित असतात, त्याचाही आत्मविश्वासावर परिणाम होतो. जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःकडे झालेले दुर्लक्ष, लग्न, बाळंतपण यामुळे करिअरमध्ये पडलेला खंड आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी गमावलेल्या संधी, त्यामुळे पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत स्वतःला कमी समजणे, अशा गोष्टी दिसून येतात.
समाजामध्ये स्त्रियांच्या शारीरिक स्वरूपाबाबत, सौंदर्याबाबतही काही विशिष्ट संकल्पना आहेत. या संकल्पनांत न बसणाऱ्या स्त्रियांना, आपल्या शरीरयष्टीबद्दल कमीपणा वाटतो. त्यामुळेही आत्मविश्वासावर परिणाम होतो. अप्रत्यक्ष घरगुती आणि सामाजिक दबावामुळेही इच्छांकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम आत्मविश्वासावर होतो.
...आणि मैत्रिणींनो याचा परिणाम म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास खुंटतो. मते मांडताना संकोच वाटतो, इतरांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाही, कौशल्य असूनही संधी घेण्यास संकोच वाटतो, स्वतःला कमी लेखले जाते, तणाव आणि नैराश्य येते. म्हणूनच तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, अगदी सोप्या; पण प्रभावी अशा काही टीप्स मी आज शेअर करणार आहे
1) नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांपासून दूर राहा. सहकार्य करणाऱ्या, प्रेरणादायी आणि सकारात्मक लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.
2) मोठ्या यशाची वाट बघत बसू नका. त्याऐवजी प्रत्येक छोटे यश साजरे करा, स्वतःच्या प्रत्येक प्रयत्नाचा अभिमान बाळगा.
3) पेहराव आणि वावर सुधारा. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे कपडे आणि आत्मविश्वासपूर्वक शरीरभाषा लक्षवेधी बनवेल.
4) कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला गोष्टी अवघड वाटल्या, तरी नवीन गोष्टींना संधी द्या.
5) संवादकौशल्य सुधारा. संभाषणात सक्रिय सहभाग घेतल्याने, मते, विचार स्पष्टपणे व्यक्त करायला शिकल्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
आत्मविश्वास एका रात्रीत येत नाही. तो सततच्या सरावाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने निर्माण होतो. रोजच्या आयुष्यात छोटे बदल करून तुम्ही स्वतःला आत्मविश्वासाने परिपूर्ण करू शकता.
मैत्रिणींनो, महिलांनी आत्मविश्वास वाढवणे ही केवळ त्यांची वैयक्तिक गरज नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. एक आत्मविश्वासू स्त्री कुटुंब, समाज आणि स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. म्हणूनच, मी करू शकते! ही भावना ठेवून पुढे जात राहा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रगती करत रहा.