सोलापूर : अक्कलकोट ते दोड्याळ रोडवरील शिवाजीनगर रिक्षा थांब्याजवळ आल्यावर नेमिनाथ शामराव राठोड (रा. दोड्याळ, ता. अक्कलकोट) याने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून घेऊन शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली, अशी फिर्याद पोलिस हवालदार डोळे यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसांत दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अक्कलकोटजवळील शिवाजी नगर तांड्याजवळून चालत जात असताना नेमिनाथ राठोड हा त्याची रिक्षा (एमएच १३, सीटी ७३९८) घेऊन आला आणि तू पोलिस आहेस ना, गेल्या आठवड्यात तूच माझी रिक्षा दुसऱ्या पोलिसांना अडवायला सांगितली होती, तुझ्यामुळे माझ्या रिक्षाचा शोध पोलिस घेत आहेत, तुझ्यामुळे मला रिक्षा चालविणे कठीण झाले असून माझे आर्थिक नुकसान झाले’ असे म्हणून त्याने पोलिस असल्याबद्दल शिवीगाळ केली.
तू पोलिस तुझ्या घरी, मला काहीही देणेघेणे नाही’ असे म्हणून त्याने दोन इतर साथीदारांना बोलावून घेतले आणि धक्काबुक्की केली. त्यात माझ्या खिशातील १७०० रुपये काढून घेतले आणि यापुढे कधीही दिसला तर असेच जबरदस्तीने पैसे काढून घेईन, अशी धमकी त्यांनी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस हवालदार कोळी तपास करीत आहेत.