टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 9 मार्चला न्यूझीलंडवर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण आणि सर्वाधिक तिसरी वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. या ऐतिहासिक विजयाच्या काही दिवसांनंतर आता बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघांसाठी बक्षिस राशी जाहीर केली आहे. बीसीसीआयने भारतीय संघावर पैशांचा पाऊस पाडला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी विजेच्या संघातील खेळाडूंसह, कोच आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांसाठी 20 मार्च रोजी 58 कोटी रुपये बक्षिस रक्कम जाहीर केली आहे. तसेच बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कर्णधार रोहित शर्मासह इतर सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
“भारताने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. टीम इंडिया सलग 4 विजयासह अंतिम फेरीत पोहचली. टीम इंडियाने बांगलादेशवर 6 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवला. तसेच न्यूझीलंडला 44 धावांनी मात करुन विजयी घोडदौड कायम ठेवली. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवला “, अशा शब्दात बीसीसीआयने टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक केलंय.
“बीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील विजयानंतर टीम इंडियासाठी 58 कोटी रुपयांचं रोख बक्षिस जाहीर करताना आनंदी आहे. खेळाडू, कोच, सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीतील सदस्यांना सन्मानित करताना हे रोख बक्षिस जाहीर केलं जात आहे”, असंही बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
बीसीसीआयने टीम इंडियासाठी पेटारा उघडला
दरम्यान टीम इंडियाची गेल्या 9 महिन्यांतील ही दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी 2024 या वर्षात टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हाही बीसीसीआयने आपला पेटारा उघडला होता. बीसीसीआयने टीम इंडियासाठी 125 कोटी रुपये प्राईज मनी म्हणून जाहीर केले होते.