आयपीएल 2025 स्पर्धाला सुरुवात होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गोलंदाजांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोरोना काळात लागू केलेला नियम रद्द केला. यामुळे गोलंदाजांना आता चेंडूला लाळ लावून शाईन करता येणार आहे. बीसीसीआयने आता गोलंदाजांना चेंडूवर लाळ वापरण्याची परवानगी दिली आहे. कोरोना काळात वाढत्या प्रादुर्भावामुळे 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना चेंडूवर लाळ वापरण्यास आयसीसीने बंदी घातली होती. या नियमाचा कित्ता गिरवत बीसीसीआयने आयपीएलमध्येही हा नियम लागू केला होता आणि गोलंदाजांना चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली होती. चेंडूला शाईन यावी यासाठी यापूर्वी लाळ आणि घामाचा वापर केला जायचा. मात्र गेल्या पाच वर्षापासून असं करण्यास मनाई होती.
बीसीसीआयच्या या बंदीमुळे गोलंदाजांना खूप त्रास सहन करावा लागला होता. चेंडूला शाईन केल्याने स्विंग आणि त्याची हालचाल करण्यास मदत होऊ शकते. कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक गोलंदाजांनी बीसीसीआयकडे हा नियम रद्द करण्याची मागणी केली. बीसीसीआयने पाच वर्षानंतर मागणी पूर्ण केली असून लाळ वापरण्याची परवानगी दिली आहे. बीसीसीआयने गुरुवारी मुंबईतील मुख्यालयात सर्व आयपीएल संघांच्या कर्णधारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बीसीसीआयने कर्णधारांना या निर्णयाची माहिती दिली.
दुसरीकडे, आयसीसीने आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणास्तव 2022 मध्ये लाळ वापरण्यावरील बंदी कायमची केली होती. कोरोना प्रार्दुभावानंतर चेंडूवर लाळेचा वापर पुन्हा सुरू करणारा आयपीएल ही पहिली क्रिकेट स्पर्धा ठरली आहे. ‘लाळेवरील बंदी उठवण्यात आली आहे. कर्णधार या निर्णयाच्या बाजूने होते,’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील विजयानंतर नुभारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लाळ वापरण्यास मुभा मिळावी अशी विनंती केली होती. लाळ वापरल्याने रिव्हर्स स्विंगची कला टिकवून राहील, असा युक्तिवाद त्यानंतर करण्यात आला होता. आयसीसी मान्य करेल की नाही ते माहिती नाही. पण बीसीसीआने आयपीएलमध्ये मात्र परवानगी दिली आहे.