सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात महिलेनंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे (Shivsena) उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी अटक पोलिसांनी केली आहे. खंडणी प्रकरणात महिलेसह, अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू असून दहिवडी येथील न्यायालयात आज अनिल सुभेदार यांना हजर करण्यात आले होते. सन 2016 पासून आपल्याला त्रास देण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असाही दावा एका महिलेने केला होता. तसेच, याबाबत सातारा पोलिसांकडे (Police) तक्रारही दाखल केल्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला होता. याप्रकरणी, जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मात्र, या महिलेकडून पैशांची मागणी होत असून आता खंडणी देताना रंगेहात पकडल्यानंतर तक्रारदार विराज शिंदे यांनी याबाबत सखोल माहिती दिली आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी एका महिलेसह शिंदे गटातील राजकीय पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हे सर्व प्रकरण ज्यांनी उघडकीस आणलं ते तक्रारदार विराज शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. त्यावेळी, या प्रकरणात आणखी मोठ-मोठी नावे पुढे येतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केलीय. संबंधित महिला वारंवार वकिलांच्या माध्यमातून फोन करून भेटण्याची मागणी करत होती. त्यामुळे 17 तारखेला पोलिसात तक्रार दाखल करून सरकारी पंचांसह महिलेची पहिल्यांदा भेट घेतली. त्यावेळी महिलेने आर्थिक मागणी केली होती. त्यानंतर 19 तारखेला पुन्हा त्या महिलेसोबत मीटिंग झाली. त्यावेळी महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेले आरोप माघारी घ्यायचे असतील तर 3 कोटी रुपये देण्याची मागणी केली. त्याचबरोबर महिलेने मंत्री जयकुमार गोरेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची देखील धमकी दिली, अशी माहिती विराज शिंदे यांनी दिली. तसेच, 17 आणि 19 तारखेच्या मिटींगनंतर 21 तारखेला महिलेला खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे.
ब्लॅकमेलिंग, खंडणी मागणाऱ्या अशा प्रवृत्तीला चाप बसावा, यासाठी 15 ते 20 मित्रांनी एकत्र येऊन एक कोटीची रक्कम गोळा केल्याचे स्पष्टीकरण विराज शिंदे यांनी दिला आहे. महिलेला पैसे देताना त्या महिलेने कागदावर सही करून पैसे स्वीकारले असल्याची खळखळजनक माहितीही शिंदे यांनी दिली. यावेळी मला कोणताही त्रास झाला नाही असं देखील त्या महिलेने सांगितले होते, अशी माहिती विराज शिंदे यांनी दिली. या कटकारस्थानामध्ये मोठ-मोठी लोक समोर येतील, असा गौप्या स्फोटदेखील शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे, याप्रकरणात आता नेमकं कोणती मोठ-मोठी माणसं आहेत, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.
अधिक पाहा..