गेवराई : बीडमधील गेवराईतील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीचे पात्र दोन महिन्यापासून कोरडेठाक पडल्याने दशक्रीया विधी विकतच्या पाण्यावर करावे लागत आहेत.त्यातच शनी अमावस्येचा योग जुळून आल्याने शनी भक्तांचे पाण्याअभावी हाल होणार असून, भाविकांची गैरसोय लक्षात घेता गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
राक्षसभुवन (ता.गेवराई जि.बीड)गोदावरी नदीच्या काठावर शनिचे साडेतीन पिठा पैकी एक मुख्य पिठ आहे. राज्यातील विविध भागातील भक्त दर्शनास येतात. रोजच या ठिकाणी भक्त दर्शनास गर्दी करत असतात.शनी,व सोमवती अमावस्येला लाखो भाविकांची शनीच्या दर्शनास मांदियाळी होत असते.
दुरदुरवरुन आलेले भाविक गोदावरीच्या पात्रात डुबकी मारून दर्शन करतात.मात्र,मागील दोन महिन्यापासून राक्षसभुवन येथील गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडल्याने दररोज होत असलेले दशक्रीया विधी पाचशे ते एक हजार रुपये देऊन विकतच्या पाण्यावर करावे लागत आहेत. येत्या २९ मार्चला शनी अमावस्या आल्याने शनीच्या गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडल्याने येणा-या भाविकांची परवड होण्याची शक्यता असून, गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शनी संस्थान तसेच नागरिकांकडून होत आहे.
रोजच होतात पन्नास ते साठ दशक्रीया विधीराक्षसभुवनच्या तीर्थक्षेत्र ठिकाणी दुरदुरचे रोज दशक्रीया विधी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मात्र, दोन महिन्यापासून गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडल्याने सद्यपरिस्थितीत विकतच्या पाण्यावर दशक्रीया विधी करण्याची वेळ आलेली आहे.यामुळेच नागरीकांची परवड होत असून,येत्या शनी अमावस्यानिमित्त येणा-या भाविकांची गैरसोय दुर करण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शनी संस्थानचे अध्यक्ष संतोष काठवटे यांनी केली आहे.