लंडन : वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील उड्डाणे शनिवारी पुन्हा सुरू झाली. सुरुवातीला मोजकी उड्डाणे होत असून, विस्कळित झालेली विमान वाहतूक पूर्ववत करण्यावर भर देण्यात येत आहे, असे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिथ्रो हे युरोपातील सर्वांत मोठे विमानतळ असून, जगातील पाचव्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ म्हणूनही हिथ्रो ओळखले जाते. या विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावरील वीज उपकेंद्राला अचानक आग लागली आणि विमानतळाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे, या विमानतळावरील उड्डाणे रद्द करावी लागली आणि हिथ्रोच्या दिशेने येणारी विमानेही अन्यत्र वळविण्यात आली.
या गोंधळामुळे १३५० विमानांची उड्डाणे रद्द झाली किंवा त्यांना अन्य विमानतळांवर उतरविण्यात आले. त्याचा फटका दोन लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना बसला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी विमानतळाचे कामकाज सुरू करण्यात प्रशासनाला यश आले असून, मोजकी उड्डाणे सुरू करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्यत्र वळविण्यात आलेली विमाने पुन्हा लंडनमध्ये परत आणणे आणि योग्य मार्गावर ही विमाने आणणे, या गोष्टींना प्राधान्य आहे. त्यामुळे रविवारनंतर वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वासही हिथ्रो विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस वॉल्डबाय यांनी व्यक्त केला. विमानतळ बंद झाल्याने प्रवाशांना फटका बसला; त्याचबरोबर विमान कंपन्यांचेही नुकसान झाले. पायाभूत सुविधा बंद पडल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. या घटनेत लाखो पौंडाचे नुकसान झाले. ही भरपाई कोण देणार, यावरूनही वाद सुरू झाले आहेत.
लंडनला जाणाऱ्या विमानांना फटकानवी दिल्ली : हिथ्रो विमानतळावरील घटनेमुळे भारतातून लंडनच्या दिशेने जाणाऱ्या ३७ विमानांना फटका बसला. यातील काही विमाने रद्द करण्यात आली, तर काही विमानांचे उड्डाण विलंबाने झाले. भारतातून युरोपला जाण्यासाठी हिथ्रो हे महत्त्वाचे विमानतळ मानले जाते.