आपल्या डोळ्यात कचरा खुपत नाही हे दुर्दैव
esakal March 23, 2025 08:45 PM

वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो

rat23p3.jpg-
52930
प्रशांत परांजपे

इंट्रो

आज गावापासून सर्व ठिकाणचे नाले, ओढे, नद्या यांची पात्रं कचऱ्याने झाकून टाकण्याची अघोषित स्पर्धा सर्वत्र सुरू आहे. आजची ही कचऱ्याने झाकलेली आणि झाकोळलेले नदीनाल्यांची पात्रं जुलैमध्ये दुथडी भरून वाहू लागतात. कधी पूर, महापूर येतो आणि पाणी नदीनाल्यांची पात्र सोडून वाट मिळेल तिकडे मानवाने टाकलेल्या भरमसाठ कचऱ्यासहित धावू लागते. दरम्यान, पाऊस कमी होतो...पाणी ओसरून जाते ...आणि मानवाच्या क्रांतीमुळे नदीनाल्याच्या काठावरील रोपांना दोनच दिवसात प्लास्टिकची फुले आलेली दिसतात. हे असे गलिच्छ चित्र आपणासमोर दिसते; पण त्याला दृष्टी तशी हवी. आपली दृष्टी मृत आहे. त्यामुळेच आपल्याला रस्त्यावर, बसस्थानक, रेल्वेमार्गावर किंवा नदीनाल्यातील कचरा डोळ्यात खूपत नाही, हे दुर्दैव आहे.

- प्रशांत परांजपे, दापोली
------------------

आपल्या डोळ्यात कचरा खुपत नाही हे दुर्दैव

नुकताच जलदिन साजरा झाला. या निमित्ताने स्वच्छ नदी शोधण्याचा प्रयत्न केला असता अतिदुर्गम भागात जिथे लोकवस्ती नाही किंवा अत्यंत कमी आहे अशा ठिकाणी निर्मळ पाणी पाहायला मिळाले; पण ही निर्मळता अस्वच्छ, गलिच्छ, प्रदुषित नद्यांच्या तुलनेत अतिसूक्ष्म असल्याचे लक्षात आले. इतकी सूक्ष्म की, समुद्राच्या खाऱ्या पाण्यात एक भांडभर (पेलाभर) गोडं पाणी मिसळावे. यामुळे अर्थातच समुद्राचे पाणी शुद्ध न होता आपले पेलाभर पाणीच खारट होणार; पण वस्तुस्थितीची जाणीव करून देताना नदी किंवा जलप्रदूषण किती महाभयंकर आहे याची कल्पना येणे आवश्यक आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व गटारे, नाला, ओहोळ, पऱ्या, नदी आणि समुद्र हे सर्वच कचऱ्याने भरून गेल्याचे दुर्दैवी चित्र आहे. याला कचरा बेदरकारपणे फेकण्याची आणि हाताला असलेली चुकीची सवय कारणीभूत आहे.
नदीत कचरा कोण टाकतो किंवा ती प्रदुषित कोण करते हे पाहाणे आवश्यक आहे. एक म्हणजे बेशिस्त नागरिक, त्या बेशिस्त नागरिकांचे अनुकरण करणारी पुढची पिढी, नदी किंवा ओहोळाच्या काठावर राहणारे नागरिक; जे आपल्या घरातील कचरा आणि सांडपाणी थेट आपल्या बाजूच्या ओहोळ किंवा नदीत सोडतात. रासायनिक कारखानदार पैसे वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात सांडपाणी कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता नाल्यात सोडतात किंवा टँकर भरून नेऊन दूरच्या नदीत सोडतात. उन्हाळ्यात कोरडे पात्र हे सांडपाणी जमिनीत जिरवते आणि शेजारी असणारी विहीर प्रदुषित करते. पावसाळ्यात याच ओहोळातील किंवा नदीतील सर्व जमा कचरा आणि रोजचे सांडपाणी प्रवाही शुद्ध पाण्यात मिसळून स्वच्छ निर्मळ असलेले पाणी प्रदुषित करते. अनेक सोसायट्या कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी इमारतीच्या बाजूला सोडून देतात. जेथे ऐन उन्हाळ्यात दुथडी भरलेला नाला/कालवा दिसतो. यामुळे मुळात अल्प असलेले शुद्ध पाणी अधिक अशुद्ध होते.
सार्वजनिक ठिकाणी कचरा होणे थांबवता येईल; पण त्यासाठी प्रशासनाची आणि शासनाची व राज्यकर्त्यांची प्रथम कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मानसिकता होणे अत्यावश्यक आहे. अनेकदा पर्यावरणस्नेहींना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. ...."तुम्ही प्लास्टिक बॅग मागू नका, वापरू नका सांगता; पण त्यापेक्षा उत्पादनच का बंद करत नाही ?.... नक्कीच, हा रास्त प्रश्न..; पण प्लास्टिक कॅरिबॅगचे उत्पादन, साठा, विक्री, फुकट वाटप, हातातून नागरिक/ग्राहकाने घेऊन जाणे, दुकानदाराने फुकट अथवा विकत देणे, कचऱ्यात प्लास्टिक कॅरिबॅग भिरकावणे अशा सर्वांसाठी कायदा व नियम शासनदरबारी आहे; पण दुर्दैवाने कोठेही त्याची अंमलबजावणी नाही. प्रत्येक नागरिकाने कायद्याचे पालन केले तर सहजशक्य आहे भारत स्वच्छ राहाणं.
पुढील उदाहरण पाहिल्यावर आपण कोठे आहोत, याची जाणीव होईल. आपल्याला परदेशी वस्तू, परदेशी व्यक्ती आणि परदेश या सर्वांचेच आकर्षण असते. परदेशी फॅशन आणि बोली याचे अपार प्रेम आपल्याला. आपण अनुकरण प्रिय असल्याने आपणाला सांगतो परकीयांचे अनुकरण करा; पण म्हणजे काय करायचे? अमेरिकेमध्ये प्लास्टिक कॅरीबॅग दुकानांमध्ये मिळते; मात्र ती कोठेही टाकल्यास कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. तेथे नो ओपन लॅण्ड स्कीम आहे. सर्वत्र हिरवळ कायम राखली जाते. त्याकरिता कष्ट व खर्च केला जातो. अशा ठिकाणी कचरा असावा, असे वाटतच नाही आणि वाटले तर दंडात्मक कठोर कारवाईला सामोरे जावे लागते. तेथील कॅरिबॅगवर संदेश असतो की, कॅरिबॅग दोन ते तीनवेळा वापरल्यानंतर ''अबक'' दुकानात जमा करावी. आपल्याला असे संकलन केंद्र सुरू करता येईल का? आणि केले तर तेथे नागरिक पिशव्या जमा करतील का0 कर संकलन केंद्र अधिक प्रमाणात असावीत. जागोजागी सुका कचरा संकलन केंद्र स्थापन करून त्या केंद्रातून सर्व कचरा पुनर्निर्माण केंद्राकडे त्वरित पाठवण्याची व्यवस्था केल्यास आपण प्लास्टिक कचरामुक्त होऊ शकतो. कायदा नियमांचे पालन आपण आपल्याच पुढच्या पिढीसाठी करूया. इतकंच करा, हा लेख दोन व्यक्तींना वाचायला द्या आणि कचरामुक्त मी अभियानात खारीचा वाटा उचला.

(लेखक कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकमुक्तीसाठी काम करतात.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.