रमेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता.२३ ः मागील अनेक महिन्यांपासून दापोडीकरांना अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठ्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दापोडी गावठाण, सिद्धार्थनगर, जयभीमनगर आदी भागांतील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा व तोही कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना पाणी साठवणूक करून टंचाईचा सामना करावा लागत आहे.
दापोडी परिसरातील बहुतांश भाग हा कष्टकरी वस्ती आणि चाळींचा आहे. मागील अनेक महिन्यांपासून त्यामधील कष्टकरी, कामगार वर्गातील कुटुंबांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. कधी पाण्याची टाकी भरली नाही. कधी व्हॉल्व खराब; तर कधी लोकसंख्येच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दापोडीकरांचे तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र सर्व भागांत समान पाणी वाटप करण्यात येते. नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन
महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता (पाणीपुरवठा) चंद्रकांत मोरे यांनी केले आहे.
दोन एमएलडी पाणी कमी
दापोडी परिसरात सध्या साधारणतः पाच ते सहा एमएलडीची पाण्याची मागणी असताना एक ते दोन एमएलडी पाण्याच्या कमी पुरवठा होत असल्याने एकंदरीत मागणीस पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. सद्यस्थितीत दापोडीत विभागवार तीन पाळ्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यातील अनियमितपणामुळे कामगार, कष्टकरी, लघुउद्योजक व गृहिणींचा खोळंबा होत आहे.
दापोडीकरांसाठी जलवाहिनी
दापोडी, सांगवी आणि परिसरातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी निगडी ते दापोडी या ग्रेड सेपरेटर मार्गावर निगडीच्या सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून ते दापोडीपर्यंत भूमिगत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दोन हजार मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे. शेवटच्या भागात जलवाहिनी सहाशे मिलीमीटरची राहणार आहे. या योजनेवर महापालिका प्रशासन सुमारे ५८ कोटी रुपये खर्च करणार आहे. निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्पाच्या बाजूने सेवा रस्त्याने दापोडीपर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या कामास अजून साधारण एक वर्ष लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
सध्याच्या उपाय योजना काय ?
- पाण्याचा अपव्यय टाळणे
- जलवाहिन्यांमधील पाणी गळती, चोरी रोखणे
- वाहने धुणे, अंगणात पाणी मारणे टाळणे
- सार्वजनिक नळ कोंडाळे, वस्ती चाळींमधील पाणी गळती थांबविणे
पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने याचा परिणाम घर व कामावर होत आहे. गेली अनेक महिन्यांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.
- वीणा शहा, नागरिक, दापोडी गावठाण
पाणी वेळेत येत नाही. अनेकदा टाकी भरत नाही. व्हॉल्व खराब आहे, अशी कारणे सांगितली जातात. पाण्याचा अपव्यय ही अनेकजण करतात. त्यावर प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.
- आकांक्षा शिंदे, नागरिक
निगडी ते दापोडी स्वतंत्र जलवाहिनीचे काम गतीने सुरू आहे. साधारण एक वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर दापोडी, सांगवी परिसरातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल.
- विजय सोनवणे, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा)