घरकुलच्या दुसऱ्या हप्त्यासाठी एल्गार
esakal March 23, 2025 08:45 PM

भिवंडी, ता. २३ (वार्ताहर)ः देशातील बेघर तसेच कच्चे घर असणाऱ्या कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनातर्फे जनमन आवास, प्रधानमंत्री आवास तसेच शबरी घरकुल योजना राबविण्यात येत आहे, परंतु शासनाकडून घरकुल योजनेतील ५,१३९ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित करण्यात आलेला नसल्याने श्रमजीवी संघटनेने शनिवारी पंचायत समितीसमोर आंदोलन केले.
भिवंडी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षात ४,४३७, जनमन आवास योजनेअंतर्गत १,८३३, मोदी आवास ४७९, घरकुल तर शबरी घरकुल ४८६ अशा एकूण ७,२३५ घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे, पण या योजनेतील लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित करण्यात आला नसल्याने श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. याच अनुषंगाने शनिवारी पंचायत समितीसमोर श्रमजीवी संघटनेचे प्रभारी ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पवार, तालुका अध्यक्ष सुनील लोणे, शहर अध्यक्ष सागर देसक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी पावसाळ्याला अवघे अडीच महिने शिल्लक असताना लाभार्थ्यांना निधीच मिळाला नसल्याने भरपावसात संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे.
-------------------------------------------------
ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष
तालुक्यात अनेक लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी गावठाणात जागा शिल्लक नाही. अनेक लोक वन विभागाच्या जागेत राहतात. त्यांना शासन निर्णयाप्रमाणे गावठाण जागेत घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी झाली नसल्याने लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यात विविध अडचणी येत असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांना देण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.