CSK vs MI: रिक्षाचालकाचा पोरगा मुंबई इंडियन्ससाठी चमकला! धोनीनंही ज्याची पाठ थोपटली, कोण आहे हा Vignesh Puthur?
esakal March 24, 2025 07:45 AM

रविवारी इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२३ मार्च) चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने विजय मिळवला असला, तरी मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले. हा खेळाडू म्हणजे २४ वर्षीय विग्नेश पुथुरने.

या सामन्यात मुंबईने चेन्नईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नई या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली असताना मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या जागेवर इम्पॅक्ट सब्स्टिट्युट म्हणून विग्नेश उतरला होता. त्याच्यासाठी हा पहिलाच आयपीएल सामना होता. पण पदार्पणातच त्याने छाप पाडली.

मधल्या षटकांमध्ये त्याने गोलंदाजी करताना चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (५३), शिवम दुबे (९) आणि दीपक हु़डा (३) यांना बाद केले. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३२ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीबद्दल त्याची सामन्यानंतर चेन्नईचा दिग्गज खेळाडू एमएस धोनीनेही पाठ थोपटली.

कोण आहे विग्नेश पुथुर?

विग्नेशला या सामन्यापूर्वी फार कोणी ओळखत नव्हतं. पण त्याला शोधण्याचं काम मुंबई इंडियन्सच्या स्काऊटने केलं होतं. त्याला केरळ प्रीमियर लीगमध्ये पहिल्या हंगामात अल्लप्पी रिपल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सच्या स्काऊटने हेरलं.

त्यांनी त्याच्यावर कामही केले. त्याने मुंबईच्या नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. अखेर आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईने त्याला ३० लाखांच्या किंमतीत खरेदी केले.

२ मार्च २००१ रोजी विग्नेशचा केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील पेरिंथलमन्ना येथे जन्म झाला. तो अष्टपैलू खेळाडू असून तळात फलंदाजी करतो, तर डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. त्याचे वडील सुनील कुमार हे रिक्षा चालक आहेत, तर आई केपी बिंदू या गृहिणी आहेत.

असे असतानाही घरी जरी आर्थित चणचण असली, तरी त्यांनी विग्नेशला क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. दरम्यान, क्रिकेटमध्ये करिकर करत असतानाही त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं नाही. तो पेरिंथलमन्ना येथील पीटीएम गव्हरमेंट कॉलेजमधून साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

त्याच्यासाठी केरळ प्रीमियर लीगमध्ये पहिल्या हंगाम खास राहिला. कारण इथूनच त्याच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले आहे. त्याने या हंगामात तीन सामने खेळताना २ विकेट्स घेतले होते.

दरम्यान, अद्याप त्याचे केरळच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण झालेलं नाही. पण तो वयोगटातील क्रिकेट केरळ संघाकडून खेळला आहे. तो तामिळनाडू प्रीमियर लगीमध्येही खेळला होता.

मिडिया रिपोर्ट्सनुसार सुरुवातीला मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या विग्नेशला स्थानिक क्रिकेटपटू मोहम्मद शरिफने लेग स्पिन टाकण्याचा सल्ला दिला, ज्याचा त्याला नंतर फायदा झाला. त्याने नेट्समध्ये केरळच्याच असलेल्या संजू सॅमसनलाही नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे.

आता तो मुंबई इंडियन्ससाठी नवा स्टार झाला असून त्याच्याकडे अनेकांचे लक्ष यापुढे असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.