पनवेल, ता. २४ (बातमीदार) : उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू केल्या आहेत; परंतु या निर्णयाचा तालुक्यातील काही खासगी शिक्षण संस्था व शाळांना विसर पडलेला दिसतो. पारा चाळिशीच्या जवळ पोहोचला तरी शाळा दुपारच्याच सत्रात भरविल्या जात असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाचे चटके सोसस शाळेत जावे लागते व घामाच्या धारा पुसत वर्गात बसावे लागत असल्याची खंत काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू झाल्या आहेत; मात्र खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा आपल्या नियमित वेळेप्रमाणेच भरत आहेत. यात प्रामुख्याने दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांना जागेची अडचण भासत असल्याने या शाळा दोन्ही सत्रांत भरविल्या जातात. माध्यमिक शाळांविषयी माध्यमिक शिक्षण विभाग व शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निर्णय घेतला जातो. एप्रिलमध्ये त्यांच्या परीक्षा होणार असल्याने १ एप्रिलपासून या शाळा सकाळ सत्रात सुरू होतील, असा अंदाज वर्तविला जातो. परंतु ज्या शाळा एकाच सत्रात भरतात त्यांनी सकाळच्या सत्रात वर्ग घेण्याची मागणी पालकांकडून होत आहे. शहरातील खासगी शिक्षण संस्था व शाळांकडूनही या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. बालवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते ५ किंवा १२.३० ते ५ या वेळेत बोलविले जाते. त्यामुळे भरउन्हात मुलांना शाळेत यावे लागते. याशिवाय दिवसभर शाळेत बसून मुलांना कंटाळा येतो. त्याचा अध्ययानावर विपरीत परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले.
------------------
महिलांची चांगलीच तारांबळ
ज्या पालकांना दोन मुले आहेत त्यांची एकच तारांबळ उडते. एक मुलगा सकाळच्या सत्रात आणि दुसरा दुपारच्या सत्रात शाळेत जातो. त्यामुळे एकाला सोडवण्यासाठी जायचे तर दुसऱ्याची शाळा सुटलेली असते. त्याला घरी सोडवायचे तर दुसऱ्याची शाळा भरण्याची वेळ झालेली असते. वेळेचे गणित सांभाळताना महिलांची तारेवरची कसरत होत आहे. सकाळ सत्राच्या शाळेसाठी पहाटे पाचला उठून डबा तयार करावा लागतो. तर दुपार सत्रासाठी पुन्हा नव्याने जेवण बनवावे लागते. त्यामुळे सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी पालकांनी केली आहे.
----------------
मुलांना शाळेत पाठवताना ही काळजी घ्या
शाळेत पाठवताना मुलांना टोपी आणि चष्मा घालावा. टिफिनमध्ये काकडी, टरबूज, खरबूज, केळी यांचा समावेश असलेली जास्तीत जास्त फळे द्यावीत. यासोबतच कमीत कमी दोन लिटर लिंबू आणि साखर मिसळून पाण्याचे ड्रिंक तयार करा आणि ते मुलांना द्या किंवा दही आणि मठ्ठा द्या. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. तुम्ही मुलांना नारळाचे पाणीही दररोज पिण्यासाठी देऊ शकता. तसेच दिवसातून किमान दोनदा अंघोळ घालावी.
------------------
उन्हाचा पारा वाढत असल्याने विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होतो. उन्हामुळे ताप व सर्दी यांसारखे आजार बळावत आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांसह खासगी संस्थांच्या शाळाही सकाळच्याच सत्रात भरायला हव्यात.
- सायली सरक, अध्यक्ष, हिरकणी सामाजिक संस्था
----------------------
मार्च महिना सुरू झाल्याने दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जात आहेत.
- सीताराम मोहिते, गटशिक्षणाधिकारी, पनवेल