पनवेल, ता. २४ (बातमीदार) : केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण भारतात आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून पुढील १०० दिवसांच्या कालावधीत क्षयरोग दूरीकरण मोहीम राबविण्यात आली. क्षयरोग नियंत्रण विभागाने १०० दिवस केलेल्या कामामुळे तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या, तर तालुक्यात केलेल्या ४८ हजार क्षयरुग्ण तपासणीमधून अवघे नवीन १७ नवे क्षयरुग्ण आढळले.
क्षयरोग दूरीकरण मोहिमेअंतर्गत पनवेल तालुक्यामध्ये १०० दिवसांमध्ये ४८ हजार लोकांची क्षयरोग तपासणी करण्यात आली होती. क्षयरोग नियंत्रण विभागाने १०० दिवस केलेल्या कामामुळे तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या, तर तालुक्यात केलेल्या ४८ हजार क्षयरुग्ण तपासणीमधून अवघे नवीन १७ नवे क्षयरुग्ण आढळले. गेल्या तीन महिन्यांपासून या मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धा, क्षयरुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांविषयी प्रबोधन व घरोघरी जाऊन क्षयरुण शोधण्याची मोहीम घेण्यात आली. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या क्षयरोगमुक्ती कार्यक्रमात सर्वांना क्षयरोगमुक्तीची शपथ दिली. नि:क्षय आवाहनाद्वारे गावोगावी जाऊन क्षयरोग निदानासह प्रबोधन करण्यात आले. यापूर्वी तीन आठवडे सलग खोकला असेल तर तपासणी केली जात होती. यापुढेही जात दोन आठवडे व क्षयरुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची एक दिवस खोकला असेल तरीही तपासणी केली. ‘लवकर निदान व त्वरित उपचार’ याप्रमाणे ६० वर्षांवरील व्यक्ती, वसतिगृहे, होस्टेल, कारागृह, औद्योगिक वसाहती, सार्वजनिक ठिकाणे, वीटभट्टी व साखर कारखाने येथे क्षयरुग्ण शोधमोहीम घेतली. यातून गेल्या १०० दिवसांत अवघे १७ नवे रुग्ण वाढल्याने पनवेल तालुक्याची क्षयरोगमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा पवार यांनी दिली.
----------
क्षयरोगमुक्त झालेली गावे
देवळोली, पोसारी, जांभिवली, गुळसुंदे, कराडे खुर्द, सावळे, दिघाटी, तुराडे, केळवणे, नांदगाव, बारवई, सोमाटणे, भातन, चिखले, पोएंजे, शिरवली, मालडुंगी, वाकडी, धुंदरे, उमरोली, खैरवाडी, खानाव, पाले बुद्रुक, नितळस, चिद्रण, गव्हाण नाव्हा, तरघर, ओवळे, पारगाव, वाघिवली, वडघर
----------
क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी गेले १०० दिवस विविध स्पर्धा, प्रबोधन मोहिमेसह विविध उपक्रम घेतले. यातूनच नवीन क्षयरुग्ण शोधमोहीम झाली. ही मोहीम यशस्वी झाली आहे. पनवेल तालुक्यातील ३२ गावे क्षयरोगमुक्त झाली असून, लवकरच संपूर्ण तालुका क्षयरोगमुक्त होणार आहे.
- डॉ. अपर्णा पवार, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल