राज्यात उष्णतेचा पारा वाढला, काळजी घ्या!
कामाव्यतिरिक्त घराबाहेन न पडण्याचे डॉक्टरांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : उन्हाचा पारा वाढत असून, धावपळीचे जीवन जगणाऱ्या मुंबईकरांना या उष्णतेचा चांगलाच फटका बसत आहे. थेट सूर्याच्या संपर्कात आल्याने मुंबईकरांना डिहायड्रेशनचा त्रास, डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
मुंबईतील तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले आहे. अनेक मुंबईकरांना घेरी येणे, डोकेदुखीसारखा त्रास जाणवत आहे, तर लहान मुले आणि गर्भवती महिलांनाही उन्हाच्या संपर्कात बऱ्याच अडचणी जाणवत आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.
मानवी शरीर काही प्रमाणात उष्णता सहन करू शकते, पण प्रखर उष्णता विशेषत: वेळेवर उपचार न केल्यास घातक ठरू शकते. मुले, वृद्ध व्यक्ती आणि स्ट्रोक, हृदय, श्वसनविषयक आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी उष्ण तापमान घातक ठरू शकते. अनेकदा प्रखर तापमानामुळे उष्माघातदेखील होऊ शकतो. या गंभीर स्थितीमध्ये प्रखर उष्ण तापमानामुळे शरीराचे तापमान १०४ फॅरेडहून अधिकपर्यंत वाढते. परिणामत: शरीर तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही, ज्यामुळे तापमान वाढते आणि घाम येत नाही. परिणामी शरीराला थंडावादेखील मिळत नाही. उष्माघात झालेल्या व्यक्तीमध्ये गोंधळून जाणे, डोकेदुखी, मळमळ व चक्कर येणे, अशी लक्षणे दिसून येतात. वेळेवर या लक्षणांवर उपचार न केल्यास मृत्यूदेखील होऊ शकतो किंवा कायमचे विकलांगत्व येऊ शकते.
उष्णतेचा त्रास अधिक होत असल्यास उन्हात फिरणे टाळणे आवश्यक आहे. उन्हाच्या संपर्कात आल्यास चक्कर येणे किंवा डोकेदुखीवर काही खास औषधांची गरज नसते. त्यांनी केवळ सावलीत काही काळ घालवल्यासदेखील ही समस्या कमी होऊ शकते, तर चक्कर आलेल्या व्यक्तीला थंड जागी, सावलीखाली नेणे, डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी आणि ओआरएस किंवा लिंबू सरबत देणे गरजेचे आहे. काही जास्त वाटल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात जाणे आवश्यक आहे. उष्माघात जीवघेणादेखील ठरू शकतो, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.
बृहन्मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये तीव्र उष्ण लाट जाणवू लागली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात अशी परिस्थिती वारंवार उद्भवू शकते. उष्ण लहरींची परिस्थिती वारंवार उद्भवण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या काळात काय करावे, काय करू नये, याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गरजेनुसार बेड उपलब्ध करणार आहोत.
- मोहन जोशी,
अधिष्ठाता, सायन रुग्णालय
फळे, भाजीपाला लाभदायक
नागरिकांनी उष्माघाताचा त्रास जाणवू नये, यासाठी उन्हात जाणे टाळावे. अधिक पाणी प्यावे, तिखट व तेलकट पदार्थांचे सेवन कमी करणे, आहारात फळे व भाजीपाल्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.