छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूर पोलिस लवकरच याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.
प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचसोबत त्याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. याप्रकरणी कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार होता. जामीनासाठी त्याने कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिस त्याचा शोध घेत होते अखेर तो तेलंगणात सापडला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रशांत कोरटकर गेल्या महिनाभरापासून फरार होता. अखेर तेलंगणातून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूर पोलिस हे थोड्याच वेळात यासंदर्भातील महत्वाची आणि अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, कोरटकर हा दुबईला पळाल्याची चर्चा होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका-प्रतिटीका झाली होती.
आता हा तेलंगणात कसा आणि कुठे सापडला याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. कोरटकरच्या अटकेसंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. थोड्याच वेळात कोल्हापूर पोलिस अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पार पडणार होती. त्याआधीच ही अटक झालेली आहे. आता प्रशांत कोरटकरला महाराष्ट्रात पोलिस आणण्याची शक्यता आहे.
प्रशांत कोरटकरला अटक नाही, तो सरेंडर झाला!प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. 'कोरटकरची अटक ही तेलंगणातून झालीये. सरकारने कोरटकरला सगळ्या बाजूने वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे, आज अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होती. कदाचित जामीन फेटाळण्यात आला असावा किंवा जामीन मिळण्याची शक्यता कमी असल्यानेच शेवटी पर्याय उरला नाही आणि तो सरेंडर झाला. त्याची तेलंगणातून अटक दाखवण्यात आली. हा सगळा प्रकार बघता हे गृहखात्याचे अपयश असल्याचे दिसून येत आहे.', असे सुषमा अंधारे म्हणाल्या.