अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा निषेध करणाऱ्यांविरुद्ध सध्या कडक कारवाईचं धोरण स्वीकारल्याचं दिसत आहे.
पॅलेस्टिनी संघटना संबंध असल्याच्या आरोपानंतर भारतीय संशोधक विद्यार्थी बदर खान सुरी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेतील एका न्यायालयानं अटकेत असलेला भारतीय संशोधक विद्यार्थी बदर खानच्या प्रत्यार्पणाला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे.
बुधवारी व्हर्जिनियातील अलेक्झांड्रियाच्या जिल्हा न्यायाधीश पॅट्रिशिया गिल्स यांनी बदर खान सुरीला भारतात परत पाठवण्यास नकार दिला.
बदर खान सुरीला भारतात पाठवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचे प्रयत्न सुरु होते. बदर खान सुरीची पत्नी मफाज युसूफ सालेहच्या याचिकेवर न्यायाधीशांनी हा आदेश दिला आहे.
17 मार्च रोजी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीनं (डीएचएस) पॅलेस्टिनी संघटना हमासशी संबंध असल्याच्या आरोपांखाली बदर खान सुरीला ताब्यात घेतलं होतं.
बदर खान सुरी हा वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन विद्यापीठात संशोधक आहे. त्याची पत्नी मफाज सालेह ही पॅलेस्टिनी वंशाची अमेरिकन पत्रकार आहे.
मफाजही यापूर्वी अनेक वर्षे भारतात राहिली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं या प्रकरणाची माहिती केवळ प्रसार माध्यमांत आलेल्या वृत्तावरुनच समजली असल्याचं म्हटलं आहे.
त्याचबरोबर सुरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप मदतीसाठी संपर्क केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सुरीची मफाजशी कशी झाली भेट?2011 मध्ये गाझा येथे मानवतावादी यात्रेदरम्यान बदर खान आणि त्याची पत्नी मफाज सालेह यांची भेट झाली होती.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांसह भारतातील अनेक कार्यकर्ते या यात्रेत सामील होते. ते अनेक देशातून प्रवास करत गाझा येथे पोहोचले होते.
या यात्रेचा उद्देश पॅलेस्टिनी प्रश्नांबाबत जागरुकता निर्माण करणे हा होता. यात भारतातील इतर अनेक कार्यकर्ते यात सामील झाले होते.
त्यावेळी भारतीय अभिनेत्री नेही यात सहभाग नोंदवला होता.
या यात्रेहून परत आल्यानंतर बदर पुन्हा आपल्या वडिलांसोबत गाझाला गेला आणि तेथे मफाजशी विवाह केला.
2011 मध्ये गाझा येथे मानवतावादी यात्रेदरम्यान बदर खान आणि त्याची पत्नी मफाज सालेह यांची भेट झाली होती.
कमी बोलणारा, गंभीर स्वभावाचा विद्यार्थीबदर खान सुरीने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या नेल्सन मंडेला सेंटर फॉर पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन सेंटरमधून एमए केलं आहे. नंतर त्याच संस्थेतून पीएच.डी देखील केली आहे.
त्यांनं पीएच.डीसाठी 'ट्रान्झिशन डेमोक्रसी, डिव्हाइड सोसायटीज अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर पीस: अ स्टडी ऑफ स्टेट बिल्डिंग इन अफगाणिस्तान आणि इराक' असं शीर्षक असलेला प्रबंध लिहिला होता.
आपल्या या प्रबंधात, त्यानं वांशिकदृष्ट्या विभागलेल्या आणि संघर्षाचा सामना करणाऱ्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याच्या आव्हानांचा अभ्यास केला होता.
शिवाय असा युक्तिवाद केला की, असे प्रयत्न पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सामाजिक विभाजनांमुळं कमकुवत होतात.
बदर खान सुरी मूळचा उत्तर प्रदेशमधील सहारनपूरचा आहे. सध्या त्याचं कुटुंब दिल्लीत राहतं. त्याचे वडील खाद्य विभागात इन्स्पेक्टर होते. आता ते निवृत्त झाले आहेत.
जामिया मिलिया इस्लामिया येथील बदरचा वर्गमित्र आमिर खान म्हणतो, "तो एक गंभीर विद्यार्थी आहे. तो तसा शांत प्रवृत्तीचा आहे. रस्त्यावरील निदर्शने, आंदोलनात तो सहभागी होत नाही. परंतु पॅलेस्टिनी प्रश्नांवर त्याचे स्वतःचे विचार आहेत."
आमिरच्या म्हणण्यानुसार, बदर खान खूप कमी बोलतो. पण जेव्हा तो बोलतो तेव्हा तो त्याचा मुद्दा खूप गांभीर्यानं मांडतो.
बदर खान सध्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिसमध्ये अलवालीद बिन तलाल सेंटर फॉर मुस्लिम ख्रिश्चन अंडरस्टँडिंगमध्ये पोस्टडॉक्टरल फेलो आहे.
बदर खान सुरी विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत दाखल झाला होता आणि जॉर्जटाउन विद्यापीठात शिकवत होता. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न हा त्याच्या संशोधनाचा केंद्रबिंदू आहे.
त्याला ताब्यात का घेतलं?अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीनं सोमवारी (17 मार्च) रात्री व्हर्जिनियातील आर्लिंग्टन येथील त्याच्या घराबाहेरून त्याला ताब्यात घेतलं होतं.
डीएचएस आणि इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटच्या (आयसीई) एजंटांनी त्याला ताब्यात घेतलं, तेव्हा त्याची पत्नी देखील तिथे उपस्थित होती.
ट्रम्प प्रशासनानं त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे 'हमासचा प्रचार' केल्याचा आणि 'संशयित दहशतवाद्यांशी' संपर्क ठेवल्याचा आरोप केला आहे.
फॉक्स न्यूजला दिलेल्या निवेदनात अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, सुरीचा हमासशी संपर्क होता आणि तो सोशल मीडियावर सेमिटिक विरोधी म्हणजेच ज्यू विरोधी कंटेंट शेअर करत होता.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात अमेरिकन अधिकाऱ्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत.
मात्र, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी बदर खान सुरीला अमेरिकेतून परत पाठवण्याचे आदेश दिले होते. सुरीवर ज्यूंच्या विरोधात भावना भडकावल्याचाही आरोप आहे.
बदर खान सुरीला सध्या लुईझियाना येथील डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. बदर खान सुरीच्या वकिलांनीच ही माहिती दिली आहे.
बदरच्या वकिलांनी काय म्हटलं?बदर खानच्या अटकेनंतर त्याचे वकील हसन अहमद यांनी त्याच्या तात्काळ सुटकेची मागणी केली.
ते म्हणाले की, बदर खानवर केलेली कारवाई पॅलेस्टिनींच्या अधिकारांसाठी बाजू मांडणाऱ्यांना ठरवून टार्गेट करण्याचा प्रकार असल्याचं हसन अहमद यांनी म्हटलं आहे.
त्याच्या वकिलानं प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, बदर खानविरुद्धची कारवाई त्याची पत्नी पॅलेस्टिनी असण्याशी आणि तिच्या पॅलेस्टाईन समर्थक कारवायांशी संबंधित आहे.
जोपर्यंत न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत बदर खानचे प्रत्यार्पण करता येणार नाही, असं जिल्हा न्यायाधीश पॅट्रिशिया गिल्स यांनी आपल्या 20 मार्च रोजीच्या आदेशात म्हटलं आहे.
या आदेशानंतर त्याचे प्रत्यार्पण तात्काळ थांबवण्यात आले असून, त्याचा खटला अमेरिकेत कायदेशीररित्या चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बदर खानचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही किंवा त्याच्याविरुद्ध कोणतेही आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत, असं बदर खान सुरीच्या वकिलानं त्याच्या वतीने सादर केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान, डीएचएस त्यांच्या दाव्यावर ठाम आहे की, बदर खानचे हमासच्या शीर्ष सल्लागाराशी संबंध आहेत. मात्र, या सल्लागाराची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
त्याचवेळी, बदर खानच्या पत्नीनं शपथपत्रात म्हटलं आहे की, तो फक्त दोनदा गाझाला गेला आहे. पहिल्यांदा 2011 मध्ये मानवतावादी यात्रेदरम्यान आणि दुसऱ्यांदा आपल्याशी विवाह निश्चित करण्यासाठी.
काही कट्टरतावादी वेबसाइट्सनी बदर खान विरोधात मोहीम सुरू केली होती. त्यामुळं त्याला लक्ष्य करण्यात आलं, असा दावा मफाज सालेहने केला आहे.
बदर खान सुरीच्या कुटुंबीयांनी अद्याप या घडामोडीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बीबीसीशी बोलताना कुटुंबाशी संबंधित लोकांनी सांगितलं की, त्यांना प्रसार माध्यमांशी न बोलण्याचा कायदेशीर सल्ला देण्यात आला आहे.
त्याचवेळी बदर खानचा वर्गमित्र असलेल्या आमिर खाननं बीबीसीला सांगितलं की, या घटनेनंतर त्याच्या कुटुंबाकडेही फारशी माहिती नाही.
आमिर खाननं बीबीसीला सांगितलं की, "बदरच्या कुटुंबीयांना सध्या काहीच समजत नाही आणि त्यांच्याकडे फारशी माहितीही नाही. त्याची पत्नी मफाज हिलाही फारशी माहिती नाही.
काल त्याच्या वकिलाशी बोलणं झालं आणि बदर सध्या लुईझियानामधील एका डिटेंशन सेंटरमध्ये आहे."
त्याचवेळी त्याची पत्नी मफाज सालेहने आपल्या जाहीर निवेदनात म्हटलं आहे की, बदरच्या अटकेमुळं त्यांचं कौटुंबिक जीवन प्रभावित झालं आहे. बदरची तात्काळ सुटका करण्याची मागणीही सालेह यांनी केली आहे.
'पॅलेस्टिनी अधिकार' कार्यकर्त्यांवर ट्रम्प प्रशासनाची कारवाईडेमोक्रॅटिक पक्षाचे व्हर्जिनिया येथील संसदीय प्रतिनिधी डॉन बेअर यांनी बदर खानला ताब्यात घेणं हे त्यांच्या घटनात्मक अधिकारांचं स्पष्ट उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.
अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियननेही बदर खानवरील कारवाईला असंवैधानिक म्हटलं आहे.
बदर खानपूर्वी पॅलेस्टिनी संशोधक आणि कोलंबिया विद्यापीठाचा विद्यार्थी महमूद खलील यालाही हमास समर्थक घटनांमधील सहभागाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं.
खलीलकडे अमेरिकन ग्रीन कार्ड आहे. ज्यामुळं त्याला अमेरिकेत राहण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो.
ट्रम्प प्रशासनानं अलीकडच्या काही काळात पॅलेस्टिनी प्रश्नांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?दरम्यान, सुरी किंवा त्यांच्या कुटुंबानं मदतीसाठी कोणताही संपर्क केलेला नाही, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालयाला या व्यक्तीला ताब्यात घेतल्याचं प्रसार माध्यमातील वृत्तावरुनच समजलं आहे.
जयस्वाल म्हणाले, "अमेरिकन प्रशासन किंवा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबानं आमच्याशी संपर्क साधलेला नाही."
भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांनी स्थानिक कायद्यांचं पालन केलं पाहिजे, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या दुसऱ्या निवेदनात म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात, रजनी श्रीनिवासन या कोलंबिया विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय संशोधक विद्यार्थिनीने स्वतः अमेरिका सोडलं होतं. रजनीवर पॅलेस्टिनी गट आणि त्यांच्या प्रश्नांचे समर्थन केल्याचा आरोपही करण्यात आला होता.
गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात ऑक्टोबर 2023 पासून संघर्ष सुरू आहे. हमास आणि इस्रायल यांच्यात तात्पुरता युद्धविराम झाला होता.
त्यानंतर या आठवड्यात इस्रायलच्या हल्ल्यात चारशेहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून युद्धविराम करारात पुढे प्रगती झाली नाही.
हमासनं 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायली भागावर हल्ला केला होता. या हल्ल्यात विदेशी नागरिकांसह सुमारे 1200 लोक मारले गेले आणि हमासनं 251 लोकांना ओलीस ठेवलं होतं.
यानंतर गाझामध्ये सुरू झालेल्या इस्रायली कारवायांमध्ये 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.