तांबट पक्ष्याचा ठाण्यात मुक्काम
esakal March 26, 2025 01:45 AM

ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार)ः हिवाळा संपल्याने उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. या काळात पानगळ सुरू झाल्याने विविध पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सरू असतो. अशातच मुंबई परिसरात आढळणारा तांबट पक्षी ठाण्यात मुक्कामी आला आहे.
वसंत ऋतूमध्ये निसर्गात अनेक बदल होतात. झाडांची पानगळती होऊन नवी पालवी फुटते. झाडांवर हिरवी लालसर पाने बहरताना या पानांमध्ये आणखीन एक मोहक रूप दिसत आहे. अशातच पक्षी अभ्यासक वीरेंद्र घरत यांनी ठाण्यात तांबट चिमणीचा वावर असल्याचे दिसून आले आहे. १५ ते १६ सेंटिमीटर लांबीचा हा पक्षा हिरवा, लाल, काळा आणि पिवळ्या रंगछटांमुळे आकर्षक दिसतो. फेब्रुवारी ते एप्रिल हा तांबट पक्ष्याचा विणीचा हंगाम असतो. या काळात झाडांच्या फांदीवर चोचीने टोचून स्वतःचे डोलीसारखे घरटे तयार करतो.
---------------------------------------------------
मुंबईचा पक्षी म्हणून प्रसिद्ध
तांबट हा मुंबईचा पक्षी म्हणून प्रसिद्ध आहे. झाडांच्या फांदीवर घरटे बनवणारा तांबटला ‘टूक-टूक’ या नावानेदेखील ओळखले जाते. महाराष्ट्रात तांबटचे विविध प्रकार आढळतात. मुंबई-ठाण्यात आढळणारा तपकिरी डोक्याचा तर उत्तर महाराष्ट्रात विशेष करून पश्चिम घाटात पांढऱ्या गालांचा तांबट आढळतो.
---------------------------------------
रसाळ फळांचा आहार
तांबट हा मुख्यतः रसाळ फळांवर अवलंबून असतो. कधी कधी छोटे किडेही खातो. गर्द झाडांमध्ये लपून राहणारा हा पक्षी सध्या पानगळतीमुळे सहज नजरेस पडतो आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी हा उत्तम काळ मानला जातो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.