योजनाबद्ध धेयपूर्ती
esakal March 26, 2025 12:45 PM

- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

या आधीच्या लेखांमध्ये काही विशिष्ट कौशल्ये वेळ व्यवस्थापन, अनुशासन आणि शिस्तीशी निगडित होते. एक महत्त्वाचे कौशल्य सगळ्यांनीच विकसित करणे गरजेचे आहे ते म्हणजे ‘योजना.’ तुमच्या योजना काळजीपूर्वक आणि तपशीलवार असल्यास त्या अमलात आणणे सोपे असते.

योजनांशी निगडित बरेच ऑनलाइन क्लास उपलब्ध आहेत आणि त्याच्या जोडीला विविध सॉफ्टवेअर्सही आहेत. हे स्किल्स व्यवस्थित शिकणे जास्त चांगले. ‘योजना’ची सुरुवात आपले ध्येय काय आहे, यापासून सुरू होते.

अनेकदा आपल्याला, म्हणजे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक असो किंवा एक प्रश्न पडतो, ‘माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे?’ म्हटले तर उत्तर अवघड आहे आणि म्हटले तर सोपे. आपल्या आयुष्यात काय करायचे आहे त्याचे शॉर्टटर्म आणि लॉँगटर्म असे दोन प्रकारात ध्येय निश्चित केले तर त्याचे नियोजन करणे सोपे होईल.

योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या पाहिजेत. प्रत्येक लक्ष-छोट्या भागामध्ये विभागणी करणे योजनेसाठी सोपे होते आणि साध्य करायला सहज पडते. तुमचे अंतिम ध्येय काय? उदाहरणार्थ तुम्हाला शासकीय सेवेत (आयएएस/आयपीएस) जायचे असेल तर त्या दृष्टिने कुठले विषय घ्यायचे, बारावीनंतर कुठली शाखा निवडायचे जेणे करून स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडतील.

त्यानंतर पुरेसा वेळ मिळेल असे विषय निवडून, स्पर्धा परीक्षेची तयारी, कोचिंग क्लासेस, तसे वातावरण असेल अशा ठिकाणी निवास या सगळ्या गोष्टी आपल्या योजनेच्याच एक भाग असतात. या सगळ्या गोष्टी जुळून आल्यात तर यश मिळण्याची शक्यता दाट होते आणि मग तुमचे प्रयत्न आणि बुद्धिमत्ता यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही व्यवसायात असला तर असेच टप्पे पाडून त्याची आखणी केली आणि त्याची पाठराखण करून अंमलबजावणी केली तर यश मिळणारच.

अगदी गिर्यारोहण करणारे, किंवा एखाद्या खेळाची तयारी करणे खेळाडू देखील एक-दोन वर्षांपासून योजनेनुसार त्याची तयारी करतात. रोज ३-४ किमीपासून २०-३० किमी धावायचे असेल तर ५-६ महिने वेळ देऊन टप्याटप्याने तिथपर्यंत पोहोचायचे म्हणजे शरीराला त्याची सवय पडते, क्षमता वाढते, स्नायू मजबूत होतात. आपले यशही अशाच गोष्टींवर अवलंबून आहे.

जेवढी आराखड्यानुसार मेहनत घ्याल तेवढा फायदा, ध्येयसमोर न ठेवता मेहनत करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. निर्णय आपला आहे. वेळोवेळी आपण आपल्या ठरलेल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करीत आहोत की नाही हे बघणे ही आवश्यक आहे.

योजना तयार केल्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी शिकता. त्याची अंमलबजावणी करणे अनुभवणे आणि एकाग्रतेने येऊ शकते, फक्त आपली इच्छाशक्ती असणे जरुरी आहे. म्हणतात ‘इच्छा तिथे मार्ग...’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.