मुंबई : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विडंबन काव्याचे आणि त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित स्टुडिओच्या केलेल्या तोडफोडीचे विधानसभेत पडसाद उमटले. ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असेल आणि ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेला आदर आहे त्यांना अपमानित करण्याचे प्रकार घडत असतील तर कठोर कारवाई केली जाईल,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कामराने माफी मागावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त गाणे सादर केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी एमआयडीसी परिसरातील ‘हॅबिटॅट’ स्टुडिओची तोडफोड केली. याच स्टुटिओमध्ये कामराने संबंधित कार्यक्रम सादर केला होता. कामराच्या गाण्याचा शिवसैनिकांनी जोरदार निषेध केला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांसह काँग्रेसच्या नेत्यांनी कामराचे समर्थन केले. या मुद्द्यावरून विधानसभेत सोमवारी जोरदार गदारोळ झाला. शिवसेनेचे सदस्य अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत कामरावर कारवाई करण्याची मागणी केली. ‘‘मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याबद्दल चुकीचे उद्गार काढणाऱ्या कामरा यांचे मादक द्रव्य प्रकरणाशी असलेल्या संबंधाची चौकशी करण्यात यावी.
तसेच एकूणच कामरा यांचीच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात यावी,’’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी खोतकर यांच्या या म्हणण्याशी संमती दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या कामरा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी सभागृहात गोंधळ करत कामरा यांच्या अटकेची मागणी केली. अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. गोंधळ शांत होत नसल्याचे पाहून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब केले.
त्यानंतर पुन्हा सभागृह सुरु झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, स्वातंत्र्याचा वापर स्वैराचार म्हणून केला जात असेल तर कोणालाही सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारे आम्ही नाहीत, परंतु असे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर स्वैराचाराकडे झुकत असेल तर ते मान्य होणार नाही. कामरा याने यापूर्वीही पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याबाबत खालच्या दर्जाचे वक्तव्य केले आहे. वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास असल्याचे यातून दिसते,’’असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले,‘‘कामरा यांच्या व्हिडिओ नंतर विरोधी पक्षाचे काही नेते तत्काळ समर्थन देत असतील, तर त्यांना सुपारी दिली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता, त्यावेळी तुमचे स्वातंत्र्य मर्यादित होत असते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने कोण खुद्दार आणि कोण गद्दार हे दाखवून दिले आहे. मात्र कोणी जर सुपारी घेऊन अशा प्रकारे राज्यातील आदर्श असलेल्या व्यक्तींचा अपमान करणार असेल, त्यावर कठोर कारवाई केली जाईल.’’ फडणवीस यांनी कामराकडून माफीची मागणी करण्यास विरोधकांनी मात्र आक्षेप घेतला.
स्टुडिओची तोडफोडमुंबई : कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्याचा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी तीव्र विरोध करत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. काही वेळातच ४० ते ५० शिवसैनिकांनी हॅबिटॅट स्टुडिओत घुसून हल्ला केला. हल्ल्यापूर्वी स्टुडिओतील प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी शिवसेना नेते मुरजी पटले यांच्या नेतृत्वाखाली कामराविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नेत्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
माफी मागणार नाही : कामराउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या तिरकस टिपणीबद्दल माफी मागणार नसल्याचे कुणाल कामरा याने पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. माफी मागणार नसलो तरी याप्रकरणी सुरू झालेल्या चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचे कामराने म्हटले आहे. कामरा हा सध्या मुंबईत नसून पोलिसांनीही हजर राहण्यासाठी त्याला वेळ अद्याप दिलेली नाही.
महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचे काम कोणी करणार असेल आणि असा स्वैराचार झाल्यानंतर आपण शांत बसलो, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे देशाच्या व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उठू नये यासाठी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
कुणाल कामरा काही चुकीचे बोललेला नाही. गद्दाराला गद्दार म्हणणे हा कोणावर हल्ला नाही. मुख्यमंत्र्यांनी नागपूरप्रमाणेच येथेही कारवाई करावी,
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोठे आहे? केवळ तोडफोडीचे कृती स्वातंत्र्य आहे. तुम्ही (एकनाथ शिंदे) तुमचा मूळ पक्ष सोडला आणि सत्तेसाठी दुसरा पक्ष स्थापन केला. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?
- जया बच्चन, खासदार, समाजवादी पक्ष