गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएल 2025 मध्ये विजयाचे खाते उघडले आहे. केकेआरने राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थानने 152 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे केकेआरने 17.3 षटकांत दोन गडी गमावून सहज पूर्ण केले. केकेआरचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने स्फोटक फलंदाजी केली. त्याने 61 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 97 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना डी कॉकने वेगवान गतीने धावा केल्या. त्याने मोईन अलीसोबत पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. मात्र, 12 चेंडूत 5 धावा काढल्यानंतर सातव्या षटकात मोईन धावबाद झाला. तर 11व्या षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे वानिंदू हसरंगाच्या जाळ्यात अडकला. रहाणेने 15 चेंडूत 18 धावा केल्या.
यानंतर डी कॉकने रघुवंशीसोबत पदभार स्वीकारला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची अभेद्ध भागीदारी केली. केकेआरला शेवटच्या तीन षटकांत 17 धावांची आवश्यकता होती. दरम्यान, जोफ्रा आर्चरने टाकलेल्या 18व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर डी कॉकने एक चौकार आणि दोन षटकार मारून केकेआरला विजय मिळवू दिला.
तत्पूर्वी, राजस्थानने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १५१ धावा केल्या. ध्रुव जुरेलने सर्वाधिक 33 धावांचे योगदान दिले. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती, मोईन अली, हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आरआरने सलग दुसरा सामना गमावला आहे.