प्रिय मित्रवर्य कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) यांस लाख लाख दंडवत.
अधिवेशनाचा धबडगा आटोपून तुम्ही ताबडतोब दरे गावातील शेतात जाणार असे कळल्याने आधीच हे पत्र दऱ्याला रवाना करीत आहे. ठाण्यात हल्ली तुमचा जीव रमत नाही का? कुणाल कामराच्या किरकोळ काव्य किरकिरीमुळे कान किटले का? (‘क’ची कमाल लक्षात आली का?) असे काव्य फार मनाला लावून घेऊ नका, अशी विनंती करण्यासाठीच हे गोपनीय पत्र लिहित आहे. सभागृहात शेजारी बसूनही आपल्याला (हल्ली पहिल्यासारखे) बोलता येत नाही. पुढल्या बाकाचा हाच नेहमी प्रॉब्लेम होतो. शाळेतही मला हीच समस्या भेडसावत असे. कुणाच्यातरी काहीतरी (कुका) कविता ऐकून तुम्ही अपसेट झालात असे कळले.
तुमच्यासारख्या ठाण्याच्या ढाण्या वाघाने असे विनाकारण खवळून कसे चालेल? एवढुशा बंडल कवितेने तुम्ही इतके रागावलात? ठसका लागून तुमच्या डोळ्यात पाणी आले. एवढी का तुम्हाला सुपारी लागली? तुम्हाला म्हणून सांगतो, कुकाची कविता कंडम आहे. तिला ना कुठलं मीटर, चालही चोरलेली! शब्दही चुकीचेच!! यात कसला आलाय विनोद? साधे विनोद तावडेजी पण नाहीत. पण तरीही तुम्ही अपसेट झालात. मला तर हे लोक काय काय बोलत होते, ते जरा आठवा. अन्नावरुन उठवले होते. कलिंगड काय, टरबुज्या काय, फालतू काय…पण मी हूं की चूं केले नाही. आता माझ्या हातात होम डिपार्टमेंट आले असल्याने कुणी घरच्या घरीही टरबुजे खात नसतील!! ते जाऊ दे. आता हे ऐका.
ऐकाच!-
एक होता कुका, त्याला भेटला टका
टका घेऊन भुंका, थोडं तरी शिका
कुका गेला ठाण्याला, तिथं खाल्ली मिसळ
मामलेदाराच्या झटक्यानं जाम झाली जळजळ
कुका गेला कोकलत, बांदऱ्याला गेला फाफलत
तिथं भेटला टका, म्हणून भुकला कुका!
…अशा काही ओळी मला कालच सुचल्या! कशा आहेत? काही काव्यरसिकांना मी या ओळी दाखवल्या. त्यांनी ‘वईट्ट’ असे म्हटले. माझ्या मते चांगल्या झाल्या आहेत. जळणारे जळतात. त्यांना चांगलं काव्य कळत नाही. त्यांना कुकाच्या भंकस ओळी काव्य वगैरे वाटतात. नाव न घेता अशा आपण (तिघे हं!) ताशी एकशेवीस कविता पाडू शकू! आता हे ऐका :
एक होता दादू, तो म्हणे नका हो करवादू! (इथे ‘दादू’ला यमक जुळवण्यासाठी दुसरा शब्द योजिला होता. पण त्याला निराळाच वास येईल, म्हणून ‘करवादू’ हा वापरला. कसाय?) तर…
एक होता दादू, तो म्हणे नका हो करवादू
मी आणि आदू, हसतो आता खुदूखुदू!
रात्री असो वा दुपारी, देईन गद्दारांची सुपारी
बघून घेईन एकेकाला, बिछड गये बारी बारी
जो उरेल त्याला वंदू, जो जाईल त्याला निंदू
मी आणि आदू, हसतो आता खुदूखुदू
…अशाही ओळी सुचल्या आहेत. नागपूरला गेलो की कविता पूर्ण करीन, आणि चाल लावून व्हायरलसुध्दा करीन. पण तुम्ही हसा बुवा! हल्ली तुम्ही (पहिल्यासारखे) मुळीच हसत नाही, अशी माझी प्रेमळ तक्रार आहे. त्या कुकाचे घर आपण उन्हात बांधू, मग तर झाले?
कळावे. आपला नागपुरी दिलदार मित्र.
नानासाहेब फ.
ता. क.: मीदेखील आपल्या दादासाहेब बारामतीकरांवर एक पंजाबी उडत्या चालीचे गाणे केले आहे. मखणा, ढोलणा, सजणा वगैरे शब्दांची पखरण आहे.
त्यात यमक जुळवण्यासाठी ‘ ओय धरणां धरणां’ अशी ओळ आहे. तुम्हाला पाठवू का? मग तर हसाल?