मुंबई : राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार ५५५ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २ हजार ८५२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी दिली. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी पासून जमा होणार याची तारीख अद्याप निश्चित नाही.
विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर यामुळे थेट जमा होणार आहे. विमा नुकसान भरपाईच्या अंतर्गत खरीप आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी २.८७ कोटी, खरीप हंगाम २०२३ साठी १८१ कोटी, रब्बी हंगाम २०२३-२४ साठी ६३.१४ कोटी आणि खरीप हंगाम २०२४ साठी २ हजार ३०८ कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे.
राज्य सरकारने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री