एकाच वैचारिक मुशीत घडलेले दोन शीर्षस्थ नेते गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नागपुरात एकत्र येत आहेत; निमित्त आहे दृष्टिहीनांना प्रकाशवाट दाखवण्याच्या सेवाप्रकल्पाच्या उद्घाटनाचे! देशहित हेच सर्वोपरी असल्याचे सांगणाऱ्या या दोघांच्याही संघटनांची वाटचाल सुरु झाली ती प्रतिकूल वातावरणातून. कमालीच्या उपेक्षेचे खडक फोडत आज दोन्ही संघटना अशा काही विस्तारल्या आहेत की त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च झाल्या आहेत. या दोन संघटना म्हणजे संघ आणि भाजप त्यांचे अनुयायी जेवढे कडवे तेवढेच त्यांचे टीकाकारही ! भारताच्या कानाकोपऱ्यात जसा संघाने विस्तार केला तसाच जीवनाच्या सर्व क्षेत्रांनाही स्पर्श केला. कामगार क्षेत्र असेल, विद्यार्थी वर्ग असेल किंवा जंगलकपारीतले आदिवासी; भारताच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या या संघटनेचा ‘परिवार’ विस्तारत गेला. ही निखळ सांस्कृतिक संघटना आहे, असा दावा केला जात असला तरी संघ परिवाराच्या प्रेरणेनेच आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि हा परिवारच राजकारणात भारतीय जनता पक्षाला ऊर्जा देत आला आहे.
सरसंघचालक मोहनराव भागवत व भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी एका कार्यक्रमातील उपस्थिती ही या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचीच. जनसंघाला एकेकाळी इतर राजकीय पक्षांनी वाळीत टाकले होते. ही परिस्थिती बदलली ती आणीबाणीत. इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात सर्व रंगाचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्ताही मिळवली, मात्र तिचे तारू दुहेरी सदस्यत्व या मुद्याच्या खडकावर आदळून फुटले.
मग जनसंघाच्या लोकांनी पुन्हा मागे न जाता भारतीय जनता पक्ष या नावाने नव्याने वाटचाल सुरू केली. तीत चढउतार काही कमी नव्हते. पण दोन दशकांतच हा पक्ष भारतातील एक प्रमुख राजकीय शक्ती बनला. विरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार चालविणारे अटलबिहारी वाजपेयी संघाशी असलेले संबंध अभिमानाने सांगत. पण संघाचा अजेंडा त्यांना चालविता आला नाही, याचे कारण आघाडी सरकारची अपरिहार्यता. २०१४ मध्ये मात्र हा पक्ष स्वबळावर सत्तेवर आला, तो विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली.
मोदी पंतप्रधानपदावर आरुढ झाल्यानंतर अयोध्येत राममंदिर, काश्मिरातील ३७० कलमाला सोडचिठ्ठी अशी संघपरिवाराची विषयपत्रिका पूर्ण करण्यात यशस्वी झाले. परंतु संघाचे ध्येय एवढ्यापुरते सीमित नाही. ‘‘हा समाज संघटित नसल्याने सातत्याने स्वातंत्र्य गमावत राहिला. म्हणूनच या देशाची धुरा मुख्यतः ज्या हिंदू समाजावर अवलंबून आहे, त्याला संघटित करणे आवश्यक आहे,’’ असा विचार मांडून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली.
एकीकडे या संघटनेचे बळ वाढत असले तरी दुसऱ्या बाजूला विघटनवादी शक्ती निष्प्रभ झालेल्या नाहीत, हेही लक्षात घ्यावे लागेल. जात, प्रांत, भाषा अशा अनेक मुद्यांवरून फुटिरपणा वाढताना दिसतो. त्याचा मुकाबला करायचा असेल तर या देशाचे एकसाची रूप संघाला अभिप्रेत नाही, वा सपाटीकरणही करायचे नाही, हे लोकांच्या मनावर ठसविण्याची गरज आहे. या देशातील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांचा संघ आदर करतो, हेही अधोरेखित करावे.
मराठी साहित्य संमेलनात ‘‘आपला मराठी संस्कृतीशी संबंध आला तो संघामुळे’’ असे मोदी यांनी जाहीर केले, ती भूमिका यादृष्टीने स्वागतार्हच. परंतु ती प्रभावीपणे धोरणांत परावर्तीत झाली पाहिजे. संघाच्या शताब्दीनिमित्त हे दोन शीर्षस्थ नेते एकत्र येताना संघकार्यातील कौतुकास्पद अध्याय असलेल्या सेवाकार्याची मुहुर्तमेढ होते आहे, हे योग्यच आहे. ते प्रतीकात्मकही आहे. केवळ हिंदुहिताची नव्हे, तर समस्त भारतीयांच्या हिताची गुढी उभारायची आहे, याचे विस्मरण या धुरिणांना होऊ नये ही अपेक्षा. ‘सौगात’ वाटणे सुरु झाले आहे, ती केवळ दाखवेगिरी न उरता मन:पूर्वक टाकलेले पाऊल ठरावे ही अपेक्षा.
देशाला महासत्ता व्हायचे असेल तर सर्वांना समवेत घेऊन चालावे लागेल ! संघाच्या शताब्दीच्या या टप्प्यावर आजवर संघाने केलेले कार्य, देशकारणात बजावलेली भूमिका यांची नोंद घेतानाच भावी आव्हानांची चर्चाही करायला हवी. या विशाल आणि खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेले संघटन, विविध समाजघटकांसाठी सुरू केलेली सेवाकार्ये आणि संघाला मानणाऱ्यांनी सत्तेपर्यंत मारलेली मजल हे संघ परिवाराचे यश आहे. पण आता काळाला अनुसरून वैचारिक आघाडीवरही भरीव काम करायला हवे.
संकल्पना स्पष्ट करायला हव्यात. १८५० ते १९५० या शंभर वर्षांत जे प्रबोधन आपल्याकडे झाले, त्याची वैचारिक शिदोरी सर्वच चळवळी आणि संघटनांना मिळाली. संघही त्याला अपवाद नाही. परंतु राजकीय यशाच्या उन्मादात काही कट्टरतावादी शक्ती घड्याळाचे काटे मागे फिरविण्याचा प्रयत्न करतात, पुनरुज्जीवनवादी अजेंडा राबवू पाहतात. थोडक्यात प्रबोधनपर्वाशी असलेला नात्याचा धागा तोडून टाकू पाहतात, तेव्हा त्यांना आवरण्याची जबाबदारीही संघप्रमुख आणि सत्ताप्रमुख या दोघांना पेलावी लागणार आहे. त्यांच्या भेटीच्या निमित्ताने या साऱ्या अपेक्षा व्यक्त करणे औचित्याला धरून होईल.