नवी दिल्ली : राणा सांगा यांच्याविषयी समाजवादी पक्षाचे सदस्य रामजीलाल सुमन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून झालेल्या चर्चेत आज राज्यसभेतील वातावरण चांगलेच तापले. सुमन यांनी माफी मागावी अशी मागणी करीत सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.
‘‘रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे राणा सांगा वीरता, राष्ट्रीयता आणि शौर्याचे प्रतीक होते. त्यांच्याविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये स्वीकारता येत नाही,’’ असे सांगून अध्यक्ष जगदीप धनकड यांनी सुमन यांनी केलेली वादग्रस्त विधाने कामकाजातून वगळण्यात आल्याची माहिती दिली.
कायदा हाती घेणे चुकीचे‘‘राणा सांगासारख्या देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक महापुरुषाचा काँग्रेस पक्ष आदर करतो,’’ असे सांगून विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी धनकड यांच्या मतांशी सहमती व्यक्त केली. पण त्यांनी सुमन यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला.
‘‘कायदा हाती घेऊन रामजीलाल सुमन यांच्या घरावर हल्ला करणे, तोडफोड आणि संपत्तीचे नुकसान करणे हे अत्यंत निषेधार्थ आहे. दलितांविरुद्ध होत असलेल्या अशा अपमानकारक गोष्टी कधीच सहन करणार नाही,’’ असे खर्गे म्हणाले. राणा सांगा देशाचे नायक होते, अशी स्तुती काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनीही केली.
राणा सांगांचा मुद्दा जात वधर्माचा विषय नाही. सुमन यांच्याविरोधात झालेल्या हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही. पण या मुद्याला वारंवार दलित समाजाशी जोडले जात असल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू यांनी केली. सुमन यांची वक्तव्ये निंदनीय आहेत. त्यांच्या विधानांचा सभागृहाने निषेध नोंदवावा, अशी मागणी पीयूष गोयल यांनी केली.
सुमन आणि काँग्रेस यांनी माफी मागेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही, असे राधामोहन दास अग्रवाल म्हणाले. धनकड यांनी सुमन यांना बोलण्याची संधी दिली. पण सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे सुमन बोलू शकले नाही आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना कामकाज तहकूब करावे लागले.