आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 12 वा सामना आज 31 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना आहे. तसेच मुंबईचा हा घरच्या मैदानातील पहिला सामना आहे. मुंबईने खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे पलटण वानखेडेत कोलकातावर मात करुन विजयाचं खातं उघडण्यासाठी तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला केकेआरचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते? जाणून घेऊयात.
मुंबईला सलग दोन्ही सामने गमवावे लागले. मुंबईला दोन्ही सामन्यात त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे सलग 2 पराभवानंतर मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू या दोघांचा प्लेइंग ईलेव्हनमधून पत्ता कट केला जाऊ शकतो. या दोघंच्या जागी युवा विघ्नेश पुथुर आणि रीस टोपली या दोघांचा समावेश केला जाऊ शकतो.
केकेआरकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये एक बदल होणार असल्याचं निश्चित आहे. ऑलराउंडर सुनील नारायण याचं कमबॅक होणार आहे. सुनीलला गेल्या सामन्यात बरं वाटत नसल्याने खेळता आलं नव्हतं. मात्र आता सुनील सज्ज आहे. सुनीलच्या कमबॅकमुळे स्पेन्सर जॉन्सन याचा पत्ता कट केला जाऊ शकतो. स्पेन्सरला गेल्या सामन्यात काही खास करता आलं नव्हतं.
पलटणचा घरच्या मैदानातील पहिला सामना
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या(कर्णधार) , नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेन्ट बोल्ट, विग्नेश पुथुर आणि रीस टोप्ली.
कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, अंगकृष रघुवंशी, मोईन अली, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.